‘रात्री-अपरात्री मित्रत्वाच्या नात्याने कधीही हाक मारा मी तयार असेन, माझ्या कर्तव्यात कुठेही कमी पडणार नाही. जनतेच्या प्रेमामुळेच आपल्याला ऊर्जा आणि ताकद मिळते,’ असा विश्वास आणि कृतज्ञ भावना साताऱ्याचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली. निमित्त होते त्यांच्या ५१व्या वाढदिवसाचे. उदयनराजेंचा वाढदिवस शनिवारी साताऱ्यात मोठ्या उत्साहात साजरा झाला, यावेळी त्यांनी शक्तीप्रदर्शन केले.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री गिरीश महाजन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित आहेत. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या आमदारांनी मात्र पाठ फिरवली. या सर्वांच्या उपस्थितीत उदयनराजे यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. दरम्यान, त्यांच्या जीवनावर एक चित्रफित दाखवण्यात आली.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, उदयनराजे हे राष्ट्रवादीचे खासदार आहेत मात्र, राज्याच्या राजकारणातील मुक्त विद्यापीठ आहेत. जे उदयनराजेंच्या नियमांचे पालन करीत नाहीत, त्यांना ते शासन करतात, अशी टिप्पणीही यावेळी त्यांनी केली. उदयनराजे हे मित्रांचा मित्र, प्रेमाला प्रेम देणारा आणि अन्यायाविरुद्ध कोणतीही पर्वा न करता आवाज उठवणारी व्यक्ती आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी उदयनराजेंचे कौतुक केले. उदयनराजेंवर आम्ही छत्रपतींचे वंशज म्हणून प्रेम करतो. उदयनराजे आणि माझी अनेकदा भेट होते. मात्र, प्रत्येकवेळी ते साताऱ्यासाठीच काहीतरी मागतात. उदयनराजेंनी केलेली साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्याच्या सुशोभीकरणाची आणि जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीला त्यांनी यावेळी जाहीर मान्यता दिली.

यावेळी शरद पवार यांनी देखील उदयन राजेंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांनी जनतेसाठी केलेल्या कार्याचे कौतुक केले. तुम्ही त्यांना जिल्ह्यात, राज्यात पाहता आम्ही त्यांना दिल्लीत पाहतो. तेथे नेहमीच उदयन राजेंचे औत्सुक्य असते. तेथे लोक उदयन राजेंच्या विनम्रतेचे कौतुक करतात, असे यावेळी शरद पवार म्हणाले.