सांगली पोलीस दलात ३२७ कर्मचा-याच्या भरतीसाठी शुक्रवारपासून जिल्हा पोलीस मुख्यालयात प्रक्रिया सुरू झाली असून, ही भरती प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी २५ सीसीटीव्ही कॅमे-यांद्वारे वॉच ठेवण्यात आला आहे.
    भरती प्रक्रियेसंदर्भात माहिती देत असताना पोलीस अधीक्षक दिलीप सावंत यांनी सांगितले, की ३२७ जागांसाठी ७ हजारांहून अधिक तरुणांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत. भरती होऊ इच्छिणा-यांना शारीरिक चाचणीसाठी कोणत्या दिवशी उपस्थित राहायचे याची माहिती ऑनलाइन कळविण्यात आली आहे. दररोज १२० उमेदवारांना चाचणीसाठी मदानात घेतले जाणार असून शारीरिक तपासणीनंतर कागदपत्रांची छाननी होणार आहे.
    पोलीस मुख्यालयात या चाचण्या होणार असून प्रत्येक क्रीडाप्रकाराच्या ठिकाणी उमेदवाराला किती गुण मिळाले हे जागेवर समजेल. याशिवाय लेखी गुणांसाठीही हीच पद्धत अवलंबण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांना स्वत:ची गुणवत्ता किती हे जागेवरच समजणार आहे. भरती प्रक्रियेसाठी ४० अधिकारी व ३०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. पोलीस भरती प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात येणार असून, उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.