सहयाद्रीच्या डोंगरावर पवनचक्की उभरायला प्रचंड विरोध झाला होता. काहीजणांनी या पवनचक्क्यांमुळे पावसाच्या ढगांवर परिणाम होतो व पर्जन्यमान कमी होते असाही दावा केला. मात्र हा दावा नंतर शास्त्रज्ञांनी खोडून काढला हा भाग निराळा.  सध्या याच पवनचक्क्यांचा वापर करून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे प्रशासन आसपास जंगलांवर नजर ठेवत आहे! या वेगळ्या प्रकारच्या जुगाडमुळे या भागात चालत असलेली प्राण्यांची बेकायदेशीर शिकार आटोक्यात येऊन गुन्हेगारांना शासन करता येईल.

या डोंगराळ भागांमध्ये गस्त घालणे, लक्ष ठेवणे हे वनखात्याच्या कर्मचाऱ्यांसाठी तसे जिकिरीचे काम. पण सह्याद्री व्याघ्रप्रकल्पातील अधिकाऱ्यांनी चार PTZ कॅमेरे पवनचक्क्यांच्या खांबावर लावले आहेत. उंचावर लावल्यामुळे या कॅमेऱ्यांच्या नजरेच्या टप्प्यात एक मोठा प्रदेश येतो. हा कॅमेरा कंट्रोल रूम मधून फिरवता येतो. 360 डिग्रीच्या कोनामध्ये फिरवून हा कॅमेरा झूमही करता येतो. या कॅमेऱ्यांच्या नजरेच्या टप्प्यात साधारणपणे एक किलोमीटरचा परिसर येतो. या उपकरणांच्या माध्यमातून रात्रीच्या वेळेला सुद्धा जंगलावर नजर ठेवता येते.

व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने रात्रीच्या वेळेला उड्डाण करण्याची क्षमता असलेले दोन ड्रोन सुद्धा वापरात आणले आहेत. हे ड्रोन एका वेळेला साधारणपणे एक तास हवेत गस्त घालू शकतात. सत्यजीत गुजर, मुख्य वनसंरक्षक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, यांनी सांगितले की शिकारी  रोखण्यासाठी रात्रीच्या वेळेला गस्त घालण्यात येत आहे व 55 च्या वर प्रोटेक्शन hut सुद्धा स्थापन करण्यात आले आहेत.

“आम्ही चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये पी टी झेड कॅमेरा व ड्रोनचा वापर सुद्धा करत आहोत. आम्ही चांदोलीच्या वरच्या भागात असलेल्या पवनचक्क्यांच्या खांबांवर हे कॅमेरे लावण्यात आले आहेत.  हा प्रदेश डोंगराळ असल्यामुळे तिथे जाणं कर्मचाऱ्यांसाठी जिकिरीचं असतं पण कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आम्हाला या भागावर लक्ष ठेवता येईल. येत्या काळात या कॅमेऱ्यांची संख्या वाढवून प्रस्तावित आहे. तसेच आमचे ड्रोन सुद्धा रात्रीच्या वेळेला उड्डाण करून परिसरावर लक्ष ठेवू शकतात,” असे गुजर म्हणाले. या कॅमेऱ्यावर वनखात्याच्या कंट्रोल रूम मधून लक्ष ठेवण्यात येते. एखाद्या भागात काही हालचाल लक्षात आल्यास कंट्रोल रूम मधील कर्मचारी तिथून हे कॅमेरा झूम करून त्या भागावर लक्ष ठेवू शकतात.

कोकणातून काही मंडळी शिकार करण्याच्या उद्देशाने कोयना व्याघ्र प्रकल्पामध्ये येतात. त्यामुळे या मार्गावरती बऱ्याच ठिकाणी चेकिंग करण्यात येते व काही दिवसांपूर्वी सशाची शिकार केलेल्या काही जणांना पकडण्यात आले. हा व्याघ्र प्रकल्प असल्यामुळे अशा बेकायदेशीर शिकाऱ्यांना सात वर्षापर्यंतचा तुरुंगवास किंवा २५ हजारांचा दंड  होऊ शकतो असे गुजर म्हणाले.

कोयना धरणाच्या बॅक वॉटर मध्ये सुद्धा नौकांच्या मदतीने अशा आगंतुकांना अटकाव करण्यासाठी गस्त घालण्यात येते आणि त्यासाठी बोटींची संख्याही सुद्धा वाढवण्यात आली आहे.

एकेकाळी कोयना वन्यजीव अभयारण्य परिसरात १६ गावं होती. यातील १४ गावांचे पुनर्वसन झाले असून आता फक्त दोन गावं पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. याबाबतचा प्रस्ताव सरकारला पाठवण्यात आला आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानांमध्ये एकूण ३३  गावं होती त्याच्या पैकी नऊ गावांना धरणासाठी आधीच पुनर्वसित करण्यात आले आहे.