राजकीय नेत्यांचा मुक्काम, उद्या मतदान

पंढरपूर : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची सांगता झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार, जयंत पाटील, चंद्रकांत पाटील यांच्यासह दिग्गज मंडळी मुक्कामी होती.  याही निवडणुकीत मंगळवेढा येथील ३५ गावाच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन राष्ट्रवादीने दिले. तर भाजपाने सरकार विरोधातील असंतोष, करोनाची विदारक स्थिती, टाळेबंदी, वीज देयके, मंत्र्यांचे भ्रष्टाचार आदी मुद्दय़ावरून सरकारला धारेवर धरले. या मतदार संघात जरी दुरंगी लढत असली तरी अपक्ष उमेदवार शैला गोडसे, सचिन शिंदे यांनी देखील प्रचारात मुसंडी मारल्याने ही निवडणूक चुरशीची आणि प्रतिष्ठेची झाली आहे. १७ एप्रिल रोजी मतदान आहे.

पंढरपूर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आ. भारत भालके यांचे निधन झाले. या रिक्त जागेवर ही निवडणूक होत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक नियम व अटी लागू केल्या. या रिक्त जागेवर राष्ट्रवादीने भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली. तर भाजपाने वेगळे समीकरण मांडत उद्योजक समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली. यापूर्वीही तीन वेळा आवताडे यांनी निवडणूक लढवली आहे. या लढतीसाठी भाजपाचे सहयोगी विधानपरिषद सदस्य प्रशांत परिचारक हे देखील इच्छुक होते. मात्र परिचारक आणि आवताडे यांना एकत्र आणून भाजपाने बेरजेचे राजकारण केले.  राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी  उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तळ ठोकला आहे. त्याच बरोबरीने मंत्री धनंजय मुंढे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे ,आ.अमोल मिटकरी,रूपाली चाकणकर,तसेच सेनेचे मंत्री उदय सामंत, गुलाबराव पाटील तर कॉंग्रेसचे नाना पटोले या सारखे दिग्गज प्रचारासाठी आले होते. प्रचारात केंद्र सरकारवर टीका, विकास कामांची आश्वासने यावर भर दिला गेला.

तर दुसरीकडे भाजपाने सरकार करोना स्थिती हाताळण्यात राज्य सरकारला आलेले अपयश, उठसूठ केंद्राकडे मदत मागणे, टाळेबंदी, वीज देयके वसुली,अवकाळी पावासाची नुकसान भरपाई, सरकार मधील मंत्र्यांचा भ्रष्टाचार आदी मुद्दय़ावर सरकार विरोधी वातावरण केले. दरम्यान मंगळवेढा येथील ३५ गावांच्या पाण्याचा प्रश्न आम्हीच सोडविणार हेआश्वासन दोन्ही पक्षाने याही निवडणुकीत दिले आहे.

भाजपाने या निवडणुकीच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, आ. सुभाष देशमुख, विजय देशमुख, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, मोहिते पाटील, खा.निंबाळकर, खा.जयसिधेश्वर यासह आ. प्रशांत परिचारक यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. मात्र, दुसरीकडे अपक्ष उमेदवार शैला गोडसे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे यांनी प्रचारात चांगलीच मुसंडी मारली आहे. या दोघांची आघाडी मुख्य उमेदवारांमध्ये धडकी भरवणारी आहे. आज या निवडणुकीसाठी प्रचाराची सांगता झाली. १७ एप्रिल रोजी मतदान आहे. या दिवशी मतदार राजा कोणाला कौल देतो हे २ मे रोजीच्या मतमोजणीत स्पष्ट होईल.