वाघ, वन्यजीव, जंगल, पर्यावरणाचे संवर्धन आणि संरक्षणासाठी उद्या, १४ डिसेंबरपासून पर्यावरणप्रेमी सुनील जोशी यांच्या १२०० किलोमीटरच्या मोहुर्ली ते मुंबई या ‘टायगर साइक्लो वॉक’ला शनिवारपासून सुरुवात होत आहे. सलग ६० दिवसांच्या या वॉकचा समारोप १० फेब्रुवारीला होणार आहे. या दरम्यान जोशी प्रत्येक गावात वन्यप्राणी व माणसांमध्ये प्रेमभावना निर्माण व्हावी, हा संदेश देणार आहेत.
२०१३ या वर्षांत ४० एकशिंगी गेंडय़ाचे शिरकाण झाले. त्यामुळे अस्वस्थ झाल्याने वाघ, वन्यजीव, जंगल, पर्यावरणाचे संवर्धन आणि संरक्षणासोबतच वन्यप्राण्यांच्या शिकारीला कुठेतरी आळा बसावा आणि वन्यप्राणी व माणसांमध्ये प्रेमभावना निर्माण व्हावी, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून वॉक आयोजित केला असल्याची माहिती सुनील जोशी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. १४ डिसेंबरला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहुर्ली गावातून सकाळी ९.३० वाजता या वॉकचा आरंभ होईल. ताडोबातून निघालेला हा वॉक दुपारी दोन ते अडीच वाजताच्या सुमारास चंद्रपूरला पोचणार आहे.
या वॉकमध्ये सुनील जोशी यांच्यासोबत वन्यजीवप्रेमी डॉ.सुसान शर्मा, इंग्लंड येथील फिल डेविस, ठाणे येथील सुधीर गायकवाड इनामदार, शालिक जोगवे, विवेक कुळकर्णी, अमोल बैस हेही सहभागी असतील. मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळुरु तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातून वन्यजीवप्रेमी सहभागी होणार आहेत. चंद्रपूर, भद्रावती, वरोरा, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, अशा विदर्भातील जिल्ह्य़ातून बुलढाणा, खान्देश करत भुसावळ, जळगाव, धुळे, मालेगाव, नाशिक, कसारा, वडापे, ठाणे करत मुंबईला ते पोचतील. या वॉकचे एकूण अंतर १२३७ किलोमीटर असून, देशभरातील शेकडो वन्यजीवप्रेमी यात सहभागी होणार आहेत.
या वॉकमध्ये वन्यजीवप्रेमींना सहभागी करून घेण्यासाठी सोशल नेटवर्क साईट्, फेसबुक व संकेतस्थळांवरही प्रचार व प्रसार सुरू आहे.  या वॉकमध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनी व ज्येष्ठ नागरिकांनीही सहभाग घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आलेले आहे. वनमंत्री पतंगराव कदम यांनी टायगर साईक्लो वॉकला शुभेच्छा दिल्या आहेत.

वनखाते मात्र अनभिज्ञच
या टायगल साईक्लो वॉकची माहिती वनखाते किंवा वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना नाही. यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यालयात दूरध्वनी केला असता, वॉक उद्या आहे काय, अशी विचारणा पत्रकारांनाच करण्यात आली. आम्हाला यासंदर्भात काहीही माहिती नाही. वनखात्याचा कार्यक्रम नसल्यामुळे आम्हीही त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे सांगण्यात आले.