पालघर : पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात मुखपट्टी परिधान करून न येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांविरुद्ध दंडात्मक कारवाई केल्यानंतर असे प्रकार करणाऱ्या नागरिकांविरुद्ध कारवाई करण्याची मोहीम जिल्हा प्रशासनातर्फे हाती घेण्यात येणार आहे.

राज्यभरात करोनाची वाढती व्याप्ती लक्षात घेता सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टी वापरण्याबाबतच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे  शासनाने सूचित केले आहे. असे असतानाही अनेक नागरिकांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, असे दिसून आले आहे. त्याची गंभीर दखल प्रशासनाने आता घेतली आहे. त्यासाठी  जिल्हाधिकारी कार्यालयाने मुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांना दोनशे रुपयांचा दंड आकारण्याचे योजिले आहे. दंड आकारण्यासाठी पावती पुस्तके छापून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा व तालुका स्तरावरील विविध शासकीय कार्यालयातील जबाबदार अधिकाऱ्यांकडे पावती पुस्तिका देण्यात येणार आहेत.

सद्य:स्थितीत स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामार्फत ही कारवाई करणे अपेक्षित असताना कर्मचाऱ्यांची कमतरता तसेच अधिकारी वर्गामध्ये असलेला निरुत्साहामुळे मुखपट्टीविना फिरणाऱ्यांवर  कारवाई होताना दिसत नाही.  जिल्हा परिषद अध्यक्षांना जिल्हाधिकाऱ्यांनी दंडात्मक कारवाई ठोठावल्यानंतर जिल्ह्यातील प्रशासन सर्व दोषी व्यक्तींवर अशाच पद्धतीनेच कारवाई करण्यासाठी तयारीला लागल्याचे सांगण्यात आले. नागरिकांनी मुखपट्टय़ांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी केला आहे.