पालघर नगर परिषदेतर्फे उपाययोजना; फिवर क्लिनिक व अलगीकरण कक्षांना मंजुरी

पालघर : पालघर नगर परिषद हद्दीमध्ये वाढत असलेल्या करोना रुग्णांची संख्या विचारात घेऊन या आजाराचे संक्रमण रोखण्यासाठी पालघर नगर परिषदेने विशेष तपासणी मोहीम हाती घेण्याचे निश्चित केले आहे. त्याचबरोबरीने नगर परिषद हद्दीमध्ये फिवर क्लिनिक व अलगीकरण कक्ष स्थापन करण्यासाठी नगर परिषद कौन्सिलने मंजुरी दिली आहे.

गेल्या दोन आठवडय़ांपासून पालघर नगर परिषद हद्दीमध्ये करोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्याने त्यावर रोख लावण्यासाठी उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. याकरिता लागणाऱ्या खर्चाला मंजुरी देण्यासाठी नगर परिषदेने बुधवारी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये या सर्व विषयांना सदस्यांनी मंजुरी दिली.

पालघर शहरातील प्रत्येक भागात नगर परिषदेतर्फे स्वयंसेवकांकडून घरोघरी जाऊन नागरिकांना सर्दी, ताप, खोकला अशा प्रकारची लक्षणे असल्याचे सर्वेक्षण करून घेण्यात येणार आहे. याकरिता प्रत्येक नगरसेवकाने पाच स्वयंसेवकांची नावे नगरपरिषदेला सुचविण्याचे आवाहन केले आहे. या स्वयंसेवकांना आवश्यक ते प्रशिक्षण व सुरक्षा उपकरणे देऊन सर्वेक्षण लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

आरोग्य विभागाच्या शीघ्र कृती दलाकरता नगर परिषदेने कर्मचारी उपलब्ध करून दिले असून त्यांच्या वाहतुकीसाठी दोन वाहने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. रुग्णाला कोविड केअर सेंटरमध्ये ने-आण करण्यासाठी नगर परिषदेकडे रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने सामाजिक संस्थेच्या रुग्णवाहिकेचा वापर करण्यात येणार असून रुग्णवाहिकेचा खर्च नगरपरिषदेतर्फे दिला जाईल, असे या बैठकीत ठरवण्यात आले.

त्याच पद्धतीने वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यासाठी लागणारे सुरक्षा साधने, थर्मल मशीन, पल्स ऑक्सिमीटर, मास्क सॅनिटायझर, हॅण्ड ग्लोज इत्यादी साधने नगर परिषद उपलब्ध करून देणार असल्याचे या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

एक हजार प्रतिजन चाचणी संचांची व्यवस्था

आजाराची लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांची तातडीने तपासणी करण्यासाठी नगर परिषदेने दोन टप्प्यांमध्ये प्रत्येकी एक हजार अँटीजन टेस्ट किटची व्यवस्था करण्याचे आरोग्य विभागाला कळवले असून त्याचा खर्च नगर परिषद उचलणार आहे. शहरातील रुग्णांचा शोध घेण्यासाठी फिवर क्लिनिक उभारण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक ते वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक मानधन तत्त्वावर करण्यात येणार आहे.

ग्रामीण भागांत ९४ नवीन रुग्ण

पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या चोवीस तासांत ९४ नवीन रुग्ण आढळले असून त्यापैकी ६६ पालघर तालुक्यातील आहे. त्याचबरोबरीने वसईच्या ग्रामीण भागात दहा, डहाणूमध्ये आठ, वाडामध्ये सात नवीन रुग्ण अढळले आहेत. पालघर तालुक्यात आढळलेल्या नवीन रुग्णांपैकी पालघर नगर परिषद हद्दीतील २८ तर बोईसर येथील २२ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मृतांची संख्या ६१ वर पोहोचली असून ४२९ प्रतिबंधित क्षेत्रे आहेत.