शनिवारी ‘व्हॅलेंटाइन डे’चे निमित्त साधून तरुणाई प्रेमाच्या आणाभाका घेण्यात मग्न असताना येथील ‘सनविवि फाऊंडेशन’ने याच दिवशी गोदावरी स्वच्छतेचा उपक्रम राबवीत त्यात युवावर्गालाही सामील करून घेतले.या स्वच्छतेसाठी युवावर्गाचा उपयोग करून घेण्याच्या उद्देशाने फाऊंडेशनने उपक्रम सुरू केला आहे. फाऊंडेशनच्या सदस्यांनी रामकुंडापासून टाळकुटेश्वर मंदिरापर्यंत नागरिकांना स्वच्छतेचे धडे दिले. नदीत वाहने व कपडे धुणाऱ्यांनाही समजाविण्यात आले. निर्माल्य नदीमध्ये न टाकता कलशात टाकण्याचे आवाहन करण्यात आले. नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या उंटवाडी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रबोधनात्मक पथनाटय़ही सादर केले. या अभियानाप्रसंगी महापालिकेचे उपायुक्त रोहिदास दोरकुळकर, स्वच्छता निरीक्षकांसह इतर अधिकारी उपस्थित होते. नाशिककरांनी गोदावरीच्या स्वच्छतेसाठी पुढे सरसावण्याचे आवाहन फाऊंडेशनचे अध्यक्ष धीरज बच्छाव यांनी केले आहे.