लडाखच्या गलवाण खोऱ्यात भारत-चीन सैन्यात झालेल्या संघर्षानंतर आता देशभरात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरु लागली आहे.राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. “12 जूनला दिल्ली मेरठ मेट्रोच्या कामात एल&टी या भारतीय कंपनीला डावलून चिनी ‘शांघाय टनेल इंजिनिअरिंग कंपनी’ला दिलेलं कॉन्ट्रॅक्ट आधी रद्द करायला सांगा”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

“आत्मनिरर्भरच्या गप्पा मारुन झाल्यानंतर भारतीय कंपनीला डावलून मीरत मेट्रोचं कॉन्ट्रॅक्ट चिनी कंपनीला देण्यात आलं. कोणी दिलं हे कॉन्ट्रॅक्ट? रेल्वे कोणाच्या अखत्यारीत आहे? केंद्राच्या ना? त्यानंतर 15 जूनला चिन्यांनी आपल्या 20 जवानांना मारले. हे कसले बोंबलाचे परराष्ट्र धोरण?”, अशी टीका आव्हाड यांनी ट्विटरद्वारे केली. तसेच, “12 जूनला दिल्ली मेरठ मेट्रोच्या कामात एल&टी या भारतीय कंपनीलाला डावलून चिनी ‘शांघाय टनेल इंजिनिअरिंग कंपनी’ला दिलेलं कॉन्ट्रॅक्ट आधी रद्द करायला सांगा”, असंही आव्हाड म्हणाले.


यापूर्वीही आव्हाड यांनी, “चीनने भारताच्या भूमीत घुसून आपल्या सैनिकांना मारलं आहे. अशावेळी चीनला धडा शिकवला पाहिजे. मोदींसोबत संपूर्ण देश आहे. आता मोदींनीही आक्रमक होऊन चीनला धडा शिकवला पाहिजे. झोपाळ्यावर बसून झालं. आता चीनकडे “लाल आंखे” करून पहायची वेळ आली आहे. काय म्हणता?” असं ट्विट करत मोदी सरकारवर निशाणा साधला होता.