दिगंबर शिंदे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाडव्याच्या पंचांगवाचनात भीती; करोनामुळे जाहीर कार्यक्रम रद्द

यंदा पावसाचे निवासस्थान वाण्याचा घरी असून मृगाचे वाहन पर्जन्यसूचक म्हैस असले तरी खरिपाच्या पेऱ्यासाठी सरत्या आडदराची वाट बघावी लागेल. वाण्याचा घरी पावसाचा मुक्काम असल्याने मोजून मापून पाऊस पडला तर रब्बीचा स्वामी मंगळ असल्याने पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवण्याची भीती आणि कंदमुळे फळे कमी दिसतील, असा अंदाज यंदाच्या पंचांगात वर्तविण्यात आला आहे. करोनामुळे ग्रामीण भागातील पंचागवाचनाचा जाहीर कार्यक्रम रद्द झाले असले तरी औपचारिकता पूर्ण करण्यात आली.

दरवर्षी मराठी नववर्षांच्या प्रारंभी गुढी पाडव्याला गावच्या पारकट्टय़ावर, ग्रामपंचायतीसमोर आगामी वर्षांचे पंचागवाचन करण्याची प्रथा ग्रामीण भागात पाळली जाते. यंदा करोनाचा प्रसार रोखण्यासाठी २४ मार्चच्या मध्यरात्रीपासूनच लॉकडाउन पुकारण्यात आले असून तत्पूर्वीच राज्य शासनाने एकत्रित जमा होण्यास बंदी घातली आहे. यामुळे गावोगावचे सार्वजनिक पंचाग वाचनाचे कार्यक्रम स्थगित करण्यात आले. आगामी वर्ष शेती पिकासाठी कसे जाणार, पाऊस काळ कसा असणार याचा अंदाज या पंचागवाचनातून शेतकरी घेत असतात. मात्र, पारंपरिक प्रथा म्हणून गावच्या भटजींनी गावकामगार पोलीस पाटलांच्या हस्ते पंचांग पूजन केले. या वर्षी मेघ निवास वाण्याचा घरी असून पाऊस मोजून मापून होईल. दोन आढक म्हणजे साधारण पाऊसमान आहे. दोन आढकपैकी सहा भाग नद्या व पर्वत यावर, चार भाग भूमीवर या प्रमाणे पाऊस पडेल.

मृग नक्षत्राचे वाहन म्हैस असून पर्जन्यसूचक आहे. मात्र उत्तरार्धात पाऊस येईल. २१ जूनपासून सुरू होत असलेल्या आद्र्रा नक्षत्राचे वाहन घोडा असून खंडित स्वरूपाचा पाऊस होईल. सर्वत्र सारखा होण्याची शक्यता कठीण आहे. सरता मृग आणि आद्र्रा नक्षत्राच्या पावसावर खरिपाचा पेरा साधणार आहे.

पंचांगवाचनातील अनुमान

पुनर्वसू नक्षत्राचे वाहन उंदीर असून १९ जुलपासून सुरू होत असलेल्या पुष्य नक्षत्राचा पाऊस समाधानकारक होईल. या नक्षत्राचे वाहन हत्ती असून ते पर्जन्यसूचक मानले जाते. याच बरोबर या नक्षत्रानंतर असलेल्या आश्लेषा आणि मघा या दोन नक्षत्रांचे वाहन अनुक्रमे मेंढा आणि म्हैस असल्याने आणि दोन्ही वाहने पर्जन्यसूचक असल्याने पाऊसमान चांगले राहील. यापाठोपाठ येणाऱ्या पूर्वा नक्षत्राचे वाहनही बेडूक असून तेही पर्जन्यसूचक आहे. या नक्षत्राचा प्रारंभ ३० ऑगस्ट रोजी होत आहे. उतरा नक्षत्राचे वाहन मोर आणि हस्त नक्षत्राचे वाहन घोडा असून या वेळी पाऊस खंडित स्वरूपाचा होईल. चित्रा नक्षत्राचे वाहन बेडूक तर स्वातीचे वाहन म्हैस असून पाऊस कमी होत जाईल आणि थंडीला सुरुवात होईल, असे अनुमान यक्त करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cancellation of panchagavachan program in rural areas canceled abn
First published on: 27-03-2020 at 00:56 IST