पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात कर्करोगावर उपचार घेत असलेल्या, डॉक्टर भारत मारुती लोटे यांनी एक व्हिडीओ प्रसारित करून मुंबई हायकोर्टाकडे इच्छामरणाची मागणी केली आहे. डॉक्टर भारत यांना स्वादुपिंडाच्या कर्करोगाने ग्रासले आहे. त्यांच्यावर उपचारादरम्यान झालेल्या शस्त्रक्रियांचा खर्च २९ लाखांच्या घरात गेला आहे. हा खर्च दिवसेंदिवस वाढतो आहे. तो परवडत नसल्याने डॉक्टर भारत यांनी हायकोर्टाकडे इच्छा मरणाची मागणी केली आहे. मिड-डे या दैनिकाने या संदर्भातले वृत्त प्रसारित केले आहे.

गेल्या २६ वर्षांपासून डॉक्टर भारत लोटे हे चिपळूणमधल्या रामपूर या गावात असलेल्या प्राथमिक वैद्यकीय उपचार केंद्रात आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत होते. यावर्षी मार्च महिन्यात त्यांना स्वादुपिंडाचा कॅन्सर असल्याचे निदान झाले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबाने तातडीने त्यांना पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल केले. पण तोवर उशीर झाला होता. कारण कर्करोगाने त्यांना मोठ्या प्रमाणावर ग्रासले असल्याचे चाचण्यांमधून समोर आले. कर्करोगातून डॉक्टर भारत बरे होतील याची शक्यता खूप कमी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले, पण आम्ही आशा सोडली नाही असे डॉक्टर लोटे यांची पत्नी संगिता यांनी म्हटले आहे.

एप्रिल महिन्यात डॉक्टर भारत यांच्यावर तीन शस्त्रक्रिया झाल्या. त्याचा खर्च २९ लाखांच्या घरात गेला. डॉक्टर भारत यांच्या प्रॉव्हिडंट फंडातून ३ लाख रूपये, घर आणि दागदागिने गहाण ठेवून ११ लाख रूपये आणि नातेवाईक-मित्रांकडून १० लाख रूपये असे २४ लाख रूपये आम्ही जमवले. मात्र दिवसेंदिवस हा खर्च वाढतो आहे. तसेच एकदा डॉक्टर भारत यांना अति-दक्षता विभागातही ठेवण्यात आले. डॉक्टर भारत यांचे आगाऊ वेतन काढावे अशी मागणी आम्ही राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडे केली होती. मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही असेही संगिता लोटे यांनी म्हटले आहे. या सगळ्या वाढत्या खर्चाचा दबाव आता कुटुंबावर आला आहे. तसेच ज्यांनी आम्हाला कर्ज म्हणून रक्कम दिली ते देणेकरीही पैशांची मागणी करत दारात उभे राहात आहेत. हा तणाव आता सहन होण्यासारखा नसल्याने आम्ही इच्छामरणाची मागणी हायकोर्टाकडे केली आहे,असेही संगिता लोटे यांनी स्पष्ट केले आहे.

डॉक्टर भारत लोटे यांनी छोट्याश्या गावात वैद्यकिय सेवा मिळावी म्हणून आयुष्यातली २६ वर्षे सेवा दिली. त्यांना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून ना. धों. कर्वे पुरस्कार आणि अहिल्या जोशी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. आता अडचणीच्या काळात आम्हाला सरकारची काहीही मदत मिळत नाहीये त्यामुळे आम्हाला इच्छामरणाशिवाय पर्याय उरलेला नाहीये. यासाठी आम्ही राज्य सरकारच्या आरोग्य विभागाला जबाबदार धरत आहोत कारण आमच्यापुढे त्यांनी कोणताही पर्याय ठेवलेला नाही, असेही डॉक्टरांच्या पत्नी संगिता यांनी म्हटले आहे. डॉक्टर लोटे यांच्या कुटुंबातर्फे आगाऊ वेतनासंदर्भात कोणताही विनंती अर्ज आमच्याकडे आल्याची माहिती नाही, असे आरोग्य सेवा संचलनालयाचे संचालक डॉक्टर सतीश पवार यांनी म्हटले आहे. तसेच असा मागणी अर्ज आल्यास आम्ही तातडीने वेतनाची रक्कम देऊ असे आश्वासनही दिले आहे.

डॉक्टर भारत यांच्या इच्छामरणासाठी आता मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात येणार आहे. इच्छामरण किंवा दयामरण हे आपल्या देशात कायदेशीर नाही. मात्र डॉक्टर भारत यांच्या मागणीचा विचार कशाप्रकारे होतो हे पाहणे महत्त्वाचे आहे. या सगळ्या प्रकरणावर काहीही बोलता येणार नाही किंवा डॉक्टर भारत यांच्यासंदर्भातली माहिती उघड करता येणार नाही असे डॉक्टर रुशाली पाटील यांनी म्हटले आहे.