लोकसभा निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत. दर पाच वर्षांनी होणाऱ्या लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होणाऱ्या उमेदवारांची संख्याही आता वाढू लागली आहे. मागील १४ निवडणुकांच्या तुलनेत १५ व्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची भलीमोठी मांदियाळी होती. खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांनी शिवसेनेचे तत्कालीन आमदार प्रा. रवींद्र गायकवाड यांचा केवळ ६ हजार ७८७ मतांनी पराभव केला. उर्वरित २३ उमेदवारांच्या खात्यात १ लाख १३ हजार ६५४ मतांची गोळाबेरीज जमा झाली होती. उमेदवारांची संख्या मागील निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडली होती. त्यामुळे नवा खासदार निवडीच्या वेळी उमेदवारांची संख्या महत्त्वाची ठरू शकते.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ १९५१ मध्ये तयार झाला. पहिल्या निवडणुकीत काँग्रेसचे राघवेंद्र दिवाण आणि शेकापचे नरसिंग बलभीमराव देशमुख यांच्यात लढत झाली. त्यानंतर १९५७ मध्ये शेकापचे भाई उद्धवराव पाटील आणि काँग्रेसचे व्यंकट श्रीनिवासराव नळदुर्गकर हे दोनच उमेदवार एकमेकांसमोर होते. या दोन्ही निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाला. त्यानंतर १९६२ आणि ६७ या दोन्ही निवडणुकीत तीन उमेदवार सहभागी झाले होते. १९७१ मध्ये मात्र उमेदवारांच्या संख्येत दोनने वाढ होऊन पाच जणांनी मतदारसंघातून निवडणूक लढविली. पुन्हा १९७७ मध्ये उमेदवारांच्या संख्येत घट होऊन एकमेकांच्या विरोधात तीन उमेदवार उभे ठाकले होते. त्यानंतर १९८० पासून २००९ पर्यंत उमेदवारांच्या संख्येचा आकडा फुगतच गेला. १९८० मध्ये पाचजणांनी, १९८४ मध्ये सहा, १९८९ मध्ये १२, १९९१ मध्ये १७ तर १९९६ मध्ये तब्बल २१ जणांनी लोकसभेच्या फडात उडी घेतली होती. त्यानंतर झालेल्या दोन लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या संख्येत अचानक घट झाली. १९९८ मध्ये सात, ९९ मध्ये पाच, तर २००४ मध्ये आठ जणांनी निवडणूक लढविली.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ २००९ पूर्वी आरक्षित होता. तो सर्व प्रवर्गासाठी खुला झाला आणि इच्छुक उमेदवारांची संख्याही वाढली. मागील १४ निवडणुकांच्या तुलनेत १५ व्या लोकसभेसाठी सर्वाधिक २५ उमेदवारांनी दंड थोपटले होते. उमेदवारांची हीच संख्या शिवसेनेच्या मुळावर उठली होती. बऱ्याच वर्षांनंतर मतदारसंघ खुला झाल्यामुळे उमेदवारांबरोबर मतदानाच्या टक्केवारीतही बऱ्यापकी वाढ झाली. एकूण १६ लाख ८ हजार ८५२ मतदारांपकी ९ लाख २४ हजार ५४७ जणांनी आपल्या मतांचा कौल २५ जणांच्या पदरात टाकला. डॉ. पद्मसिंह पाटील यांना ४ लाख ८ हजार ८४० तर शिवसेनेचे रवींद्र गायकवाड यांना ४ लाख २ हजार ३५ मतदारांनी आपले समर्थन दिले. उर्वरीत १ लाख १३ हजार ६५४ मतदारांनी २३ जणांच्या झोळीत आपले माप टाकले. प्रत्येक निवडणुकीत उमेदवारी दाखल करणाऱ्या फुटकळ उमेदवारांची संख्या वरचेवर वाढू लागली आहे. निवडणुकीच्या कालावधीत काहीतरी वाटाघाटी व्हावी, या हेतूनेही उमेदवारी दाखल करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. प्रत्येक निवडणुकीत तीन आकडय़ांपेक्षा अधिक मते न मिळालेल्या फुटकळ उमेदवारांनी आपल्या उमेदवारीत त्यासाठीच सातत्य ठेवले आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात उमेदवारांची वाढलेली संख्या पराभवास कारणीभूत ठरली, असा अंदाज आता बांधला जात आहे. त्यामुळे येणाऱ्या १६व्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची संख्याच लोकसभा प्रतिनिधी ठरवेल, अशी चर्चा आहे.