मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळ निवडणुकीतील चुरस चांगलीच वाढली आहे. प्रस्थापितांना प्रारंभी सोपी वाटणारी व परिवर्तनाचा नारा देत निवडणुकीत उतरलेल्या दुसऱ्या गटाला आवाक्यात वाटणारी ही लढाई आता मात्र अनेक तटस्थ, चोखंदळ आणि चिकित्सक मतदारांच्या कलावर जुन्या-नव्या उमेदवारांचे भवितव्य ठरवेल, असे चित्र आहे.
निवडणूक निर्वाचन अधिकाऱ्यांनी २५ ते ३० जूनदरम्यान नोंदणीकृत टपाल सेवेद्वारे २ हजार ६०० मतदारांना मतपत्रिका पाठविल्या. यानंतर दोन प्रमुख गटांचे उमेदवार, त्यांचे समर्थक-हितचिंतक सक्रिय झाले. आपापल्या हक्काच्या मतदारांकडून त्यांनी मतपत्रिका गोळा केल्याचे सांगितले जात असले, तरी बहुतांश मतदारांना कोरी मतपत्रिका हवाली करण्याऐवजी आपल्या पसंतीच्या उमेदवारांना मतदान करण्याची दक्षता घेतली. तथापि प्रस्थापित गटातील काहींनी मतपत्रिकांची ‘जोरकस उचलेगिरी’ केल्याचे दिसून आले. त्यामुळे औरंगाबाद येथून नियंत्रण करणारे या गटाचे म्होरके बऱ्यापैकी सुखावल्याचे सांगण्यात आले.
हिंगोली वगळता दोन्ही गटांमध्ये एकाच जिल्ह्य़ातील उमेदवार आमने-सामने आहेत. त्या जिल्ह्य़ातील मतदारांनी प्राधान्याने आपल्या जिल्ह्य़ातील दोन्ही गटांच्या उमेदवारांना पसंती देत, उर्वरित उमेदवारांना मतदान केल्याचे दिसून आले. सत्ताधारी गटाच्या उमेदवारांनी गोळा केलेल्या मतपत्रिका आधी औरंगाबादच्या महात्मा गांधीनगरात पाठविल्या जात आहेत. सर्वाना तशी कडक सूचना असून पुढील सोपस्काराचे ‘कवतिक’ तेथे होत आहे.
येथे मिळालेल्या माहितीनुसार मराठवाडय़ातील बहुतांश मतदारांना मतपत्रिका प्राप्त झाल्या. तथापि अपूर्ण, चुकीचा पत्ता किंवा नमूद पत्त्यावर मतदाराचे वास्तव्य नसणे अशा कारणांमुळे निर्वाचन अधिकाऱ्यांकडे दोनशेहून अधिक मतपत्रिका परत आल्या. काही मतदार पत्त्यावर वास्तव्यास असूनही त्यांना मतपत्रिका मिळाली नाही. पण ज्या मतदारांना १५ जुलैर्प्यत मतपत्रिका मिळणार नाही, ते त्यानंतर निर्वाचन अधिकाऱ्याकडे प्रत्यक्ष हजर झाल्यास त्यांना ओळख सिद्ध करून दुसरी (डुप्लिकेट) मतपत्रिका मिळवून मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. या संबंधीची सूचना निर्वाचन अधिकारी डॉ. चंद्रदेव कवडे यांनी जारीही केली.
औरंगाबाद शहर व जिल्ह्य़ातील सर्वाधिक मतदार असून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यात परिवर्तन आघाडी यशस्वी ठरली. या आघाडीने आपल्या उमेदवारांची नावे व आपली भूमिका सर्व मतदारांना नोंदणीकृत टपालाने पाठविली होती. सत्ताधारी गटाने मात्र अशा प्रकारच्या टपाल सेवेचा वापर करण्याचे टाळून आपल्या गटाच्या उमेदवारांची नावे हस्ते-परहस्ते मतदारांपर्यंत पोहोचवली.
बऱ्याच उमेदवारांच्या मतपत्रिका गोळा करण्यात आल्या असल्या, तरी त्या निर्वाचन अधिकाऱ्यांच्या दप्तरी नोंद होऊन मतपेटीत पडलेल्या नाहीत. पोस्ट किंवा खासगी टपाल सेवेद्वारे ज्यांनी मतपत्रिका पाठविल्या, त्या मतपेटीत जमा झाल्या आहेत.