05 April 2020

News Flash

तोतया परीक्षार्थी जिल्हा निवड मंडळाच्या सापळ्यात

तलाठी पदासाठी ७०६ जणांनी अर्ज केले तर ४४२ हजर झाले, वाहनचालक पदासाठी ६० जणांपैकी ४६ जण परीक्षेला बसले.

तलाठी भरतीमधील उमेदवारांची बनवेगिरी

नगर : महसूल विभागाच्या तलाठी भरतीप्रकरणात परीक्षेला पाच डमी परीक्षार्थी बसल्याचे उघड झाले. यामागे रॅकेट आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र हे प्रकरण म्हणजे गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा निवड मंडळाने लावलेल्या सापळ्यात, गैरप्रकार करणारे अलगदपणे अडकल्याचे समोर आले आहे. निवड मंडळाने परीक्षार्थीना ‘क्रॉस चेक’ करण्याची अवलंबलेली पद्धत उपयोगी पडली. विशेष म्हणजे ज्या परीक्षार्थीनी सर्वोच्च गुण मिळवले तेच बनावट उमेदवार असल्याचे निष्पन्न झाले.

परीक्षेला बसलेले पाच मूळ परीक्षार्थी व पाच डमी परीक्षार्थी अशा एकूण १० जणांविरुद्ध तोफखाना पोलिसांनी काल, गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील अस्थापना शाखेचे अव्वल कारकून जीवन भानुदास सुतार यांनी फिर्याद दिली आहे. पाच परीक्षार्थीच्या जागी डमी हजर होते, हे निवड मंडळाच्याच चौकशीत स्पष्ट झाले. त्यानंतरच गुन्हा दाखल झाला. न्यायालयाच्या आदेशामुळे तलाठय़ांच्या ३ (एक महिलेसाठी राखीव) तर वाहनचालक पदाची १ अशा एकूण ४ पदांच्या भरतीसाठी जिल्हा निवड मंडळाने दि. १२ जानेवारीला परीक्षा घेतली.

तलाठी पदासाठी ७०६ जणांनी अर्ज केले तर ४४२ हजर झाले, वाहनचालक पदासाठी ६० जणांपैकी ४६ जण परीक्षेला बसले. यापूर्वीच्या महापोर्टल मार्फत होणाऱ्या परीक्षेत डमी उमेदवार बसल्याच्या तक्रारी झाल्याने निवड मंडळाने परीक्षा पद्धत बदलली. त्यासाठी न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयील ३० व न्यू लॉ महाविद्यालयात २ परीक्षा केंद्रातून ठेवली होती. परीक्षेला बसणाऱ्या सर्व उमेदवारांचे परीक्षा हॉलमधील उपस्थितीचे व्हिडिओ शूटिंग करण्यात आले. त्यानंतर दि. १८ जानेवारीला गुणपडताळणी जाहीर करण्यात आली. दि. २० रोजी तलाठीसाठी ९ व वाहनचालकसाठी ४ जणांना कागदपत्रांच्या पडताळणीसाठी पाचारण करण्यात आले. त्यासाठी उपस्थित राहिलेल्यांचेही व्हिडिओ शूटिंग करण्यात आले. या पडताळणीसाठी मात्र मूळ उमेदवार उपस्थित राहिले. तेथेच बनवेगिरी करणाऱ्या उमेदवारांची फसगत झाली. उपस्थित उमेदवारांना, तूच परीक्षेला बसला होता का, कोणत्या रंगाचा शर्ट घातला होता, डाव्या की उजव्या हाताने पेपर लिहिला, नाव व पत्ता काय अशा स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात आले. विसंगत उत्तरे देणारे, परीक्षा हॉलमधील व पडताळणीवेळी केलेले व्हिडिओ शूटिंग तपासण्यात आले. त्यात बनवेगिरी उघड झाली. नंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली.

दि. २७ पर्यंत  पोलीस कोठडी

विशाल सखाराम इंगळे (२४, बावणे श्रीरामपूर, पुसद यवतमाळ), मंगेश कुंडलिक दांडगे (३४, रा. भोकरदन, जालना), अंजली गोपाल म्हस्के (२४,चैतन्यवाडी बलडाणा) या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयाने आज, शुक्रवारी दि. २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. याशिवाय पंढरीनाथ पुंजाजी साबळे व रवी जंगल पवार या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील ३ जण कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित होते. या पाच जणांच्या जागी डमी परीक्षार्थी होते.

पर्यवेक्षकांची चौकशी होणार

परीक्षेच्या हॉल तिकिटवर उमेदवारांचे छायाचित्र होते, त्याव्यतिरिक्त हॉलवरील पर्यवेक्षकांकडे उमेदवारांच्या छायाचित्रांची यादी देण्यात आली होती. परंतु एकाही पर्यंवेक्षकाला डमी परीक्षार्थी ओळखता आला नाही, या हलगर्जीपणाबद्दल चौकशी करून कारवाई केली जाणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली. याशिवाय या दोन्ही पदांची भरती प्रक्रिया चौकशी होईपर्यंत थांबवण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 25, 2020 2:16 am

Web Title: candidates from talathi recruitment akp 94
Next Stories
1 जर्मनीत विवाह करण्याच्या नादात घर गमावले
2 शिराळा उपजिल्हा रुग्णालयातून उत्तम आरोग्य सुविधा मिळावी – जयंत पाटील
3 भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास ‘एनआयए’कडे
Just Now!
X