लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता उद्या मंगळवारी होत असून, अंतिम टप्प्यात मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची लगीनघाई सुरू झाली आहे. गुप्त प्रचारासाठी आणि केंद्रनिहाय कार्यकत्रे चार्ज करण्यासाठी रात्रीचा दिवस करण्यात येत असून, एकमेकांची आíथक रसद तोडण्यासाठी कार्यकर्त्यांचा जागता पहारा अवघ्या मतदारसंघात दिसून येत आहे.
सांगली लोकसभेसाठी १७ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे प्रतीक पाटील आणि महायुतीचे संजयकाका पाटील यांच्यातच होत आहे. गेले दहा दिवस जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांत प्रचाराची रणधुमाळी उडाली असून, आरोपाच्या फैरी दोन्ही बाजूंकडून झाडण्यात आल्या. महायुतीने पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करून प्रचारात आघाडी घेत असताना गर्दीचा उच्चांक मोडणारी सभा असे बिरुद प्राप्त केले. मोदींच्या सभेनंतर काँग्रेस आघाडीनेही विकासकामांवर बोलण्याऐवजी मोदींच्या टीकेला उत्तर देण्यासाठी बचावात्मक प्रचाराची रणनीती अवलंबली.
काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या प्रचारासाठी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी प्रचाराचे रान मारले. सर्वाधिक सभा घेऊन त्यांनी विरोधकांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुख्यमंत्री पृथ्वीराच चव्हाण वगळता काँग्रेसचे वरिष्ठ कोणीही नेते सांगलीकडे प्रचारासाठी फिरकले नाहीत. राष्ट्रवादीचे ग्रामविकासमंत्री हातकणंगले मतदारसंघात गुंतल्याने त्यांच्याही सभा मतदारसंघात होऊ शकल्या नाहीत. विरोधकांच्या टीकेचा समाचार घेण्यासाठी काँग्रेसकडे वक्तृत्व असणाऱ्या वक्त्यांची उणीव प्रथमच जाणवली. दुसऱ्या बाजूला महायुतीने गोपीनाथ मुंडे, विनोद तावडे, देवेंद्र फडणवीस या स्टार प्रचारकांना मदानात उतरविले.
जाहीर प्रचाराची सांगता उद्या (मंगळवारी) सायंकाळी ५ वाजता होत असून, त्यानंतरच निवडणुकीचे खरे राजकारण-अर्थकारण सुरू होत असल्याने एकमेकांची आíथक रसद तोडण्यासाठी कार्यकत्रे डोळय़ांत तेल घालून जागता पहारा देत आहेत. याशिवाय निवडणुका खुल्या व निर्भय वातावरणात पार पडाव्यात यासाठी प्रशासन दक्ष आहे.
पोलिसांनी बंदोबस्ताची जोरदार तयारी केली असून सांगली, मिरज शहरांत पथसंचलन करीत मतदारांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. जिल्हय़ात २०३८ मतदानकेंद्रे असून सर्व मतदानकेंद्रांवर कडेकोट बंदोबस्त तनात केला जात आहे. बंदोबस्तासाठी पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्यासह ८ पोलीस उपअधीक्षक, २० पोलीस निरीक्षक, १३० सहायक व उपनिरीक्षक, २४०० पोलीस शिपाई, राज्य राखीव दलाच्या १०० जवानांच्या ३ तुकडय़ा असा पोलीस बंदोबस्त तनात करण्यात आला आहे.