|| निखिल मेस्त्री

युती व आघाडीच्या उमेदवारांबद्दल  शहरी भागांतील नागरिकही अनभिज्ञ

पालघर विधानसभा मतदारसंघात आमदारकीच्या निवडणूक रिंगणात उतरलेल्या कोणत्याही उमेदवाराचे दर्शन पालघर विधानसभा क्षेत्रातील काही भागांत झाले नाही. या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे श्रीनिवास वनगा आणि महाआघाडीचे योगेश नम या दोन उमेदवारांत लढत आहे. असे असले तरी प्रचारासाठी काही भाग सोडला तर या दोन्ही उमेदवारांना येथील मतदार फारसे ओळखत नसल्याचे चित्र आहे.

पालघर विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी व महायुती यामध्ये खरी लढत असली तरी महायुतीने आपला विजय निश्चित समजून या मतदारसंघामध्ये प्रचाराकडे पाठ फिरवली आहे.

श्रीनिवास वनगा यांनी केळवे शीतलाई मंदिर येथून आपल्या प्रचाराचा नारळ फोडला व पुढे आपल्या प्रचाराला सुरुवात केली असली तरी पालघर शहर व परिसरात ते या दरम्यान प्रचार करताना दिसले नाहीत. याच बरोबरीने वनगा यांनी डहाणू बाजूकडील मतदारांकडे प्रचार करण्यावर भर दिला. पालघर शहराकडे मात्र त्यांनी पाठ फिरवली आहे.

महाआघाडीचे योगेश नम यांनीही प्रचारासाठी पालघरकडे प्रचार करण्यात पाठ फिरवली. याउलट डहाणू भागात प्रचारावर त्यांनी भर दिला. मात्र रिंगणातील हे दोन्ही मुख्य उमेदवार पालघर शहर व परिसरात फिरकलेच नाहीत.

उमेदवारी अर्ज वैध ठरल्याच्या दिवसापासून ते मतदान दिवसापर्यंत हे दोन्ही उमेदवार पालघरवासीय मतदारांना दिसेनासे झाले आहेत. असे चित्र सध्या दिसत आहे. आता हे उमेदवार मतमोजणीच्या दिवशी अचानक प्रगट होतील. मात्र यापैकी निवडून येणारा उमेदवार आमदार म्हणून या मतदारसंघात किती हजेरी लावेल, याबाबतही नागरिकांमध्ये शंका कायम आहे.

‘रसदी’ची भीती

विविध खर्चापायी लागणारी ‘रसद’ हवी असल्याने अनेक इच्छुकांचा उमेदवारांकडे ओढा लागलेला असतो. या इच्छुकांपासून दूर राहण्यासाठी हे उमेदवार येथे फिरकले नसल्याचे समजते.