विनाअनुदानीत शाळांना अनुदानाची मागणी करण्यासाठी केलेल्या उपोषणात एका माध्यमिक शिक्षकाचा मृत्यु झाला, या मृत शिक्षकाला श्रद्धांजली अर्पण करुन राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने काल, शनिवारी सायंकाळी लालटाकी भागातील हुतात्मा स्मारकात ‘कॅण्डल मार्च’चे आयोजन करण्यात आले होते. अनुदानाच्या मागणीसाठी संघटनेने ‘शाळा बंद’ आंदोलनाचा इशारा दिला आहे.

आ. डॉ. सुधीर तांबे, संघटनांचे पदाधिकारी भाऊसाहेब कचरे, सुनील पंडित, एम. एस. लगड, चांगदेव कडु, राजेंद्र लांडे, आप्पासाहेब शिंदे, उद्धव गुंड, शंकरराव बारस्कर, शिरीष टेकाडे, एस. आर. पानसंबळ, राजेंद्र दरेकर, मंगेश काळे आदींच्या नेतृत्वाखाली मोठय़ा संख्येने माध्यमिक शिक्षक उपस्थित होते. शिक्षकांच्या विविध संघटना सहभागी झाल्या होत्या.

अनुदानाच्या मागणीसाठी माध्यमिक शिक्षकांनी प्रत्येक जिल्ह्य़ात १ जूनपासून बेमुदत उपोषण सुरु केले होते. जालना येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर उपोषण सुरु असताना गजानन विठोबा खरात  (३८) या शिक्षकाचा मृत्यू झाला. खरात गेल्या ८ वर्षांपासून विनावेतन काम करत होते. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले होते. राज्य सरकार अजून किती बळी घेणार, शिक्षण क्षेत्र गोरगरिबांना महाग करण्याचा हा डाव आहे, सरकारने शिक्षकांचा अंत न पाहता तात्काळ विनाअनुदानीत शाळांना अनुदान द्यावे शिक्षण क्षेत्रातील मागण्यांचा सरकारने पुनर्विचार न केल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी वक्तयांनी बोलताना दिला.