शहरातील चांदणी चौकात आज, शनिवारी दुपारी कोतवाली पोलिसांनी एका होंडा सिटी कारमधून ३ लाख रुपये किमतीचा १५७ किलो गांजा जप्त केला. यासंदर्भात दोघांना अटक करण्यात आली आहे. कारसह गांजाची किंमत सुमारे ८ लाख रुपये आहे.
मोहमद अझरउल्ला रब्बानी (२८, रा. रंगारी, तेलंगणा) व आनंद गोपाल पासफुला (२६, जरीमेटला, रंगारी, तेलंगणा) या दोघांना अटक करण्यात आली. हे दोघे होंडा सिटी कारमधून (एबी-०९-पीई ६८६) गांजा घेऊन चालले होते. गांजा डिकीत लपवला होता. शहरात सध्या वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांची तपासणी पथके तैनात आहेत. कोतवालीचे निरीक्षक सोमनाथ मालकर यांच्या तपासणीत गांजा आढळला. दोघे गांजा घेऊन तेलंगणाहून बीड-नगर-आळेफाटा मार्गे नाशिककडे जात होते.
दुपारी चारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. गांजा ओल्या स्वरूपात आहे. यासंदर्भात पोलीस उपनिरीक्षक गजानन कडेवार यांनी फिर्याद दिली आहे. गांजा प्लॅस्टिकच्या गोण्यात बांधलेला होता. अधिक तपास पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी, अतिरिक्त अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मालकर करत आहेत.