उदयनराजेंना कोणत्याही एका पक्षाच्या चौकटीत बांधता येणार नाही ते कोठेही असोत, त्यांची विधानसभा निवडणुकीत मला मदतच होणार आहे, असे मी यापूर्वीही सांगितले आहे आणि आजही सांगतो आहे. असे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा येथे सांगितले आहे.

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हे भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबतची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. काल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या शासकीय निवास्थानी भेट घेतली होती. यावेळी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन नुकताच भाजप प्रवेश केलेले आमदार शिवेंद्रसिंहराजे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. दरम्यान या भेटीत खासदार उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाबाबत निर्णय झाल्याच्याही बातम्या माध्यमांवर आल्या होत्या. तर, उदयनराजेंच्या भाजप प्रवेशांच्या चर्चेबाबत शिवेंद्रसिंहराजे यांची काय भूमिका असणार याबाबत सर्वांना उत्सुकता होती. अखेरीस आज शिवेंद्रसिंहराजे यांनी याबाबतचे आपले मत व्यक्त केले.

यावेळी शिवेंद्रसिंहराजेंनी हे देखील सांगितले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सोडताना मी कोणावरही आक्षेप घेतला नव्हता अथवा आरोपही केलेला नव्हता. केवळ माझा सातारा-जावळी मतदारसंघ आणि तेथील विकासकामे यांना प्राधान्य देताना सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन मी हा निर्णय घेतला. आता यापुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनखाली काम करणार आहे. कोणी कोणत्या पक्षात जावे हा निर्णय ज्याचा त्यांनी घ्यायचा असतो. उदयनराजे हे माझे थोरले चुलत बंधू आहेत. ते कुठेही असले तरी मला मदत करणार आहेत. तेही आता भाजपमध्ये जाणार असे समजतं आहे. मी त्यांना लोकसभा निवडणुकीत मदत केली होती. त्यामुळे यावेळेस विधानसभेला ते मला नक्की मदत करतील असे यापूर्वीही मी सांगितले आहे आणि आजही सांगतो. कारण, उदयनराजेंना कोणत्याही एका पक्षाच्या चौकटीत बांधता येणार नाही.  राष्ट्रवादीत असताना शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंना विरोध होता. पण आता नवीन पक्षात त्यांचे हे विरोधाचे राजकारण पुढे सुरू राहणार का? याविषयी शिवेंद्रसिंहराजेंना पत्रकारांनी विचारले होते, यावर त्यांनी खुलासा केला.