छावणी परिषदेच्या निवडणुकीत गुरुवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ९५ उमेदवारांनी ९७ अर्ज दाखल केले. सात वॉर्डातील नगरसेवक निवडीसाठी ११ जानेवारीला मतदान होणार असून १२ हजार ३५ मतदार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. वॉर्ड सहा वगळता सर्व वॉर्डात भाजपने अर्ज दाखल केले. सेनेचे उमेदवार सर्व वॉर्डात रिंगणात आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी व अन्य पक्षांच्या वतीने अधिकृत कोणीही अर्ज भरला नाही. मात्र, अपक्षांची संख्या मोठी आहे.
शहरालगत छावणीचे मोठे क्षेत्र आहे. गवळीपुरा, छोटा गवळीपुरा, तोफखाना, दाणाबाजार, दर्जीबाजार, पेन्शनपुरा, गडीगुडम व कर्णपुरा असे ७ वॉर्ड आहेत. ११ जानेवारीला मतदान व १२ जानेवारीला मतमोजणी होईल. मतदानासाठी मतदान यंत्रे वापरायची की मतपत्रिका हे अजून ठरले नाही. मात्र, या अनुषंगाने लवकरच निर्णय घेतला जाईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी संभाजी अडकुणे यांनी सांगितले.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ३ हजार रुपये अनामत रक्कम होती. शिवसेनेने रॅली काढून एकत्रित अर्ज दाखल केले. शिवसेनेच्या वतीने मुकेश दारुपल्ली, किशोर कच्छवा, नौशाद बेग, अलका सरकटे, जीवन यादव यांनी अर्ज दाखल केले. संजय गारुड व कुमार गांजली या अपक्ष उमेदवारांनीही शक्तीप्रदर्शन करून अर्ज दाखल केले. प्रशांत तारगे, सुरेश वर्मा, कन्हय्यालाल जैस्वाल, सागर दरक, प्रतिभा राजपूत या भाजप उमेदवारांनीही अर्ज दाखल केले. परिषदेचे अध्यक्ष सैन्य दलाचे अधिकारी असतात, तर उपाध्यक्ष निवडून आलेल्या सदस्यांतून नेमला जातो.