News Flash

वाजतगाजत प्रचार थांबला!

सायंकाळी पाचपर्यंत प्रचाराची मुभा असल्याने सर्वच पक्षांच्या प्रमुख उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांनीही जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

| October 14, 2014 01:56 am

औरंगाबाद शहरात प्रचार संपण्यापूर्वी ढोल-ताशांच्या गजरात, दुचाकीवरून सर्वपक्षीय नेत्यांनी प्रचारफेऱ्या काढल्या. प्रत्येक गल्लीबोळात दिवसभर कार्यकर्ते मतांचा जोगवा मागत फिरत होते. दुसरीकडे मतदान शांततेत व्हावे, या साठी प्रशासकीय तयारीला वेग देण्यात आला. जिल्हाधिकारी विक्रमकुमार, पोलीस आयुक्त राजेंद्रसिंग यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मतदान प्रक्रियेतील संवेदनशीलतेचा आढावा घेतला. दिवसभरात वेगवेगळ्या ठिकाणी रोख स्वरुपात रकमा पकडण्यात आल्या.
सिल्लेखाना भागात १ लाख रुपये, तर अिजठा पोलीस ठाण्याच्या हद्दीत १५ लाख रुपये जप्त करण्यात आले. प्रचारादरम्यान १२४ गुन्हे दाखल करण्यात आले. वेगवेगळ्या ठिकाणांहून १ कोटी १६ लाख २९ हजार रुपये जप्त करण्यात आले. यातील १ लाख ५५ हजार रुपये परतही करण्यात आले, तर ७६ लाख १९ हजार ९८० रुपयांचा वेगवेगळ्या स्वरुपाचा माल जप्त करण्यात आला. यात सोने व मोबाईलचा समावेश आहे.
जिल्ह्य़ातील ३७ मतदान केंद्रे संवेदनशील घोषित केली आहेत. सिल्लोड तालुक्यात सर्वाधिक १२ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. औरंगाबाद शहरात बायजीपुरा, इंदिरानगर, संजयनगर, पश्चिम मतदारसंघातील गांधेली, ‘मध्य’मधील शहाबाजार, बेगमपुरा, गांधीनगर, धावणी मोहल्ला येथील संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. शहरात सर्वत्र प्रमुख नेत्यांनी प्रचारफेऱ्या काढल्या. शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल यांनी क्रांती चौकातून, भाजपचे किशनचंद तनवाणी यांनी टीव्ही सेंटरहून, काँग्रेसचे राजेद्र दर्डा यांनी आझाद चौक, शिवसेनेच्या कला ओझा यांनी गजानन मंदिराजवळून, तसेच संजय शिरसाट यांनीही मोठी रॅली काढली. समाजवादी पक्षाचे अफसर खान व एमआयएमच्या उमेदवारांनी प्रचार केला. वेगवेगळ्या भागांत मतदारांच्या भेटी घेण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू होती.
मतदानादरम्यान कोठेही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. पोलीस आयुक्तालयातील ३ उपायुक्त, ७ सहायक उपायुक्त, ४० निरीक्षक यांसह २ हजार ५५९ पोलीस कर्मचारी, एसआरपीएफ, बीएसएफ व राज्य राखीव दलाचे जवान तैनात केले आहेत. ग्रामीण भागातील मतदारसंघांसाठी २ पोलीस उपायुक्त, २ अधीक्षक, ६ उपअधीक्षक, १८ निरीक्षक, ७२ उपनिरीक्षक, १ हजार ५८० कर्मचारी नियुक्त केले आहेत.
आरोप-प्रत्यारोप थांबवून
आता प्रत्यक्ष भेटींवर भर
वार्ताहर, उस्मानाबाद
जिल्ह्यात चारही मतदारसंघांमधील विविध पक्षांच्या व अपक्ष उमेदवारांच्या प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी शांत झाल्या. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप आणि स्वतचे कौतुक सांगण्याऐवजी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत उमेदवार मतदारांच्या घरोघरी जाऊन आपुलकीचा अध्याय पूर्ण करणार आहेत. दुसरीकडे निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याच्या प्रक्रियेलाही वेग आला आहे.
उस्मानाबाद मतदारसंघात भाजपचे उमेदवार संजय पाटील दुधगावकर, राष्ट्रवादीचे राणाजगजितसिंह पाटील व शिवसेनेचे ओम राजेिनबाळकर यांच्यात तिरंगी लढत आहे. या मतदारसंघात एकूण २० उमेदवार नशीब आजमावत आहेत. उमरगा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले, काँग्रेसचे किसन कांबळे, राष्ट्रवादीचे डॉ. संजय गायकवाड, भाजपचे कैलास िशदे या प्रमुखांसह १३ उमेदवार नशीब आजमावत आहेत. तुळजापूर मतदारसंघात परिवहनमंत्री व काँग्रेसचे उमेदवार मधुकर चव्हाण, राष्ट्रवादीचे जीवन गोरे व भाजपचे संजय िनबाळकर यांच्यात तिरंगी लढत आहे. शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख सुधीर पाटील नशीब आजमावत आहेत. या मतदारसंघातही १३ उमेदवार आहेत. परंडा मतदारसंघात राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार राहुल मोटे, शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, भाजप-रासपकडून बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर यांची तिरंगी लढत आहे. राष्ट्रवादीचे मोटे यांची प्रतिष्ठा पणाला, तर रासपचे उमेदवार हाडोंग्रीकर यांना सामाजिक कार्य तारणार का, याची उत्सुकता आहे. या मतदारसंघात १० उमेदवार आहेत. आता मंगळवारचा दिवस व रात्र प्रत्यक्ष मतदार भेटींवर उमेदवारांनी भर दिला आहे.
प्रमुख उमेदवारांसह अपक्षांची
शक्तिप्रदर्शनासह प्रचार सांगता
वार्ताहर, नांदेड
जिल्ह्यातील ९ मतदारसंघात प्रचाराच्या तोफा थंडावल्या. सायंकाळी पाचपर्यंत प्रचाराची मुभा असल्याने सर्वच पक्षांच्या प्रमुख उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांनीही जोरदार शक्तिप्रदर्शन केले. दरम्यान, प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर मतदारांना प्रलोभन देण्याचे प्रकार घडू नयेत, या साठी पोलीस बंदोबस्त तैनात केल्याची माहिती पोलीस अधीक्षक परमजितसिंग दहिया यांनी दिली.
नांदेड उत्तर मतदारसंघात काँग्रेसचे डी. पी. सावंत, शिवसेनेचे मििलद देशमुख, बसपचे सुरेश गायकवाड, राष्ट्रवादीचे डॉ. सुनील कदम, भाजपचे सुधाकर पांढरे, एमआयएमचे बागवान यांच्यासह अनेक उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करून मतदारांना साकडे घातले. नांदेड दक्षिणमध्ये भाजपचे दिलीप कंदकुत्रे, शिवसेनेचे हेमंत पाटील, काँग्रेसचे ओमप्रकाश पोकर्णा, राष्ट्रवादीचे पांडुरंग काकडे, एमआयएमचे मोईन, बसपचे अमर जावेद आदींनी शक्तिप्रदर्शन केले. शहरात बहुतांश उमेदवारांनी प्रचारफेऱ्या काढल्याने वाहतुकीची अनेकदा कोंडी झाली. एमआयएमचे हैदराबादचे खासदार ओवेसी यांनी सोमवारी मुस्लीमबहुल भागात शक्तिप्रदर्शन केले.
माजी खासदार व माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांनी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ शहरात तीन सभा घेतल्या. अल्पसंख्याक समाजाच्या तरुणांनी काँग्रेसच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले. दुसरीकडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे, संपर्कप्रमुख बबन थोरात व भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भागात मतदारांना साकडे घातले.
प्रचार थंडावल्यानंतर मतदारांना आमिष दाखविण्याचे प्रकार घडू शकतात, हे लक्षात घेऊन पोलिसांनी बंदोबस्त आणखी वाढविला. दारूची दुकाने ५ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय पूर्वीच घेण्यात आला. मतदारांना आमिष दाखविण्याच्या प्रकारात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून सर्वच भागात साध्या वेशातील पोलीस तनात आहेत. शहरात सर्वच प्रमुख नाक्यांवर तपासणी करण्यात येणार आहे. अचानक कोणत्याही भागात नाके उभारण्यात येणार आहेत. दारू वा पशाच्या वाटपावर अंकुश लावताना सोशल मीडियावरून कोणी अपप्रचार करीत असल्यास कठोर कारवाईसाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे अधीक्षक दहिया यांनी सांगितले.
सर्वच मतदारसंघात आवश्यक तो बंदोबस्त देण्यात आला आहे. पोलिसांची तयारी पूर्ण झाली असताना प्रशासनाच्या पातळीवर मतदान प्रक्रिया सुरळीत व निर्विघ्न पार पाडण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. जास्तीत जास्त मतदान व्हावे, या साठी जिल्हाधिकारी धीरजकुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व त्यांची यंत्रणा गेल्या महिन्यापासून प्रयत्नरत आहे. यंदा मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे.
परभणीत शेवटच्या दिवशी
प्रचारफेऱ्यांतून शक्तिप्रदर्शन
वार्ताहर, परभणी
जिल्ह्यातील चारही मतदारसंघात सोमवारी सायंकाळी प्रचार बंद झाला. शेवटच्या दिवशी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचारफेरी काढून शेवटच्या टप्प्यात वातावरण निर्मितीवर भर दिला. राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, भाजप या सर्वच पक्षांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
या वेळच्या विधानसभेसाठी सर्वात कमी १३ दिवसच प्रचारासाठी उमेदवारांच्या हातात होते. यातील काही दिवस नेत्यांच्या सभा व दौऱ्यात गेले. उमेदवारांना अनेक गावात कमी दिवस असल्याने पोहोचता आले नाही. शेवटच्या दिवशी परभणी शहरात राष्ट्रवादीचे उमेदवार प्रताप देशमुख यांची रॅली निघाली. ही रॅली विविध भागात गेली. समारोप स्टेडियम परिसरात झाला. काँग्रेसनेही प्रचारफेरी काढली. शिवसेनेने काढलेल्या रॅलीत उमेदवार डॉ. राहुल पाटील यांच्यासाठी प्रचार करण्यात आला.
जिल्ह्यात सर्वाधिक चुरस परभणी मतदारसंघात आहे. िरगणातील सर्व उमेदवार दिग्गज आहेत. सर्वच प्रमुख उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले. शिवसेनेला बालेकिल्ला राखण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागत आहे, तर भाजपला शिवसेनेचा पाडाव करायचा आहे. मनपा ताब्यात असल्याने राष्ट्रवादीला आपले वर्चस्व सिद्ध करायचे आहे. काँग्रेसही भवितव्य आजमावत आहे. मतदारसंघातील मुस्लीम मतांच्या जोरावर ‘एमआयएम’ची भिस्त आहे. परभणीतील बहुरंगी लढतीत सर्वाधिक उत्सुकता आहे ती अनपेक्षित निकालाची. परभणीच्या आखाडय़ातील चुरसही मतविभागणीमुळे वाढली.
गाठीभेटी, पदयात्रांवर
अखेरच्या टप्प्यात भर
वार्ताहर, िहगोली
मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी व पदयात्रांवर उमेदवारांनी शेवटच्या टप्प्यात भर दिला. जिल्ह्यातील तीन मतदारसंघांत प्रचारतोफा सोमवारी शांत झाल्या. िहगोलीत चौरंगी, तर वसमत व कळमनुरीत तिरंगी अशी लढत आहे.
िहगोली मतदारसंघात भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांनी सभा घेतली. मात्र, त्यांनी केवळ ११ मिनिटांत भाषण आटोपते घेतले. त्यांची सभा ऐकण्यास आलेले निम्मेअधिक लोक सभा न ऐकताच परत गेले. भाषण ऐकण्याची संधी हुकल्याने त्यांचा हिरमोड झाला. राष्ट्रवादीकडून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सेनगावला सभा झाली. शिवसेना व काँग्रेसच्या वतीने प्रचाराच्या पातळीवर बडय़ा नेत्यांच्या सभा घेण्याबाबत शेवटपर्यंत उदासीनता होता. काँग्रेसचे उमेदवार भाऊ पाटील गोरेगावकर, राष्ट्रवादीचे दिलीप चव्हाण, शिवसेनेचे दिनकरराव देशमुख यांनी ग्रामीण भागात मतदारांशी संपर्क साधून गावोगावी छोटेखानी सभा घेऊन वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला.
वसमत मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार जयप्रकाश दांडेगावकर यांच्यासाठी शरद पवार यांनी वसमत येथे सभा घेतली. सभेला मोठी गर्दी होती. काँग्रेसचे उमेदवार अ. हफिज अ. रहेमान यांच्या प्रचारासाठी खासदार अशोक चव्हाण यांनी हजेरी लावली. येथे भाजप व शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी कोणीही बडा नेता फिरकला नाही. येथे मुख्य लढत दांडेगावकर, भाजपचे अॅड. शिवाजीराव जाधव व शिवसेनेचे डॉ. जयप्रकाश मुंदडा यांच्यात होत आहे. कळमनुरीत काँग्रेसचे उमेदवार डॉ. संतोष टारफे यांच्यासाठी खासदार अशोक चव्हाण यांची सभा झाली. रासप उमेदवार अॅड. माधवराव नाईक यांच्यासाठी औंढा येथे पंकजा मुंडे यांची प्रचार सभा होणार होती. परंतु त्या सभेला आल्याच नाहीत. रासप प्रमुख महादेव जानकर सभेला उपस्थित होते.
प्रचाराची वेळ संपण्यास काही तास उरले असताना प्रमुख उमेदवारांनी शहरी भागात प्रभागनिहाय सभा घेऊन मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. प्रमुख उमेदवार अंतिम टप्प्यात गाठीभेटी व पदयात्रेवर भर देत असल्याचे चित्र पाहावसाय मिळाले.
लातूर शहरात प्रमुख पक्षांची
शक्तिप्रदर्शनासह प्रचारसांगता
वार्ताहर, लातूर
सोमवारी शेवटच्या दिवशी काँग्रेस, भाजपसह विविध प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी, पदयात्रांवर भर देत प्रचाराची सांगता केली. जिल्हा प्रशासनाकडून निवडणूक प्रक्रियेवर आता शेवटचा हात फिरवला जात आहे.
प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आमदार अमित देशमुख यांनी प्रचारफेरीवर जोर दिला. लातूरच्या विकासासाठी दिवंगत नेते विलासराव देशमुख यांनी काय केले, हे माझ्यापेक्षा लातूरकरांना माहिती आहे. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून मी विकासाच्या वाटेवर चालतो आहे. याची क्षणभर आठवण करा व मगच मतदान करा, असे आवाहन अमित देशमुख यांनी या वेळी केले. शहराच्या विविध भागांत त्यांनी सकाळपासून प्रचारफेरी काढली. धीरज देशमुख, अॅड. व्यंकट बेद्रे, विक्रम गोजमगुंडे, किशोर राजुरे, दत्ता लोखंडे आदी उपस्थित होते. फेरीच्या वेळी काँग्रेसकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. अभिनेते रितेश देशमुख यांचा रोड शो झाला. टाऊन हॉलच्या मदानावर प्रचाराची सांगता झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2014 1:56 am

Web Title: canvassing stop show of strength with a fanfare
Next Stories
1 आता ‘लक्ष्मीदर्शना’ची लगबग!
2 जालन्यातील ४० केंद्रे संवेदनशील
3 गल्लीबोळात फिरणारे पहिले पंतप्रधान -नारायण राणे
Just Now!
X