निखिल मेस्त्री

ऐन उत्पन्नाच्या वेळी विविध प्रजातींच्या मिरची काढणीचा व व्यवसायाचा हंगाम आला असतानाच करोनामुळे झालेल्या टाळेबंदीचा मोठा फटका जिल्ह्यातील मिरची उत्पादकांना बसला आहे. यामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांचे कोटय़वधींचे नुकसान झाले आहे. टाळेबंदीदरम्यान पिकलेला माल विकला जाणार नसल्याचे लक्षात घेत अनेक मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी आपली मिरचीची रोपे उपटून टाकली आहेत.

देशात पहिली टाळेबंदी झाली तोच काळ या मिरची विक्रीचा होता. त्या वेळी ६० रुपये प्रति किलोने विकल्या जाणाऱ्या मिरचीला साधा १० रुपये किलोही भाव मिळाला नाही. ही शोकांतिका असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. डहाणू, पालघर या तालुक्यांमधून मोठय़ा प्रमाणात वेगवेगळ्या प्रजातींच्या मिरच्यांचे उत्पादन घेतले जाते. असे असले तरी काढणीच्या हंगामातच टाळेबंदी जाहीर झाल्याने त्याचा थेट फटका मिरची उत्पादकांना बसला होता. मिरची उत्पादन घेणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचे सुमारे साठ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता आहे. काही ठिकाणी झाडांवर तयार झालेली मिरची गळून पडली आहे, तर काही ठिकाणी ही मिरची झाडांवरच पिकत चालली आहे. मिरची घेण्यासाठी किंवा इतर राज्यात पाठवण्यासाठी व्यवस्था नसल्याने मिरचीचे मोठे नुकसान झाले आहे.

पालघर जिल्ह्यात शिमला मिरचीची ४७५ हेक्टर क्षेत्रावर लागवड आहे, तर साध्या हिरव्या मिरचीची १२७५ हेक्टरवर लागवड केली जात आहे. यामध्ये डहाणू व पालघर तालुक्यात मोठय़ा प्रमाणात विविध प्रजातींच्या मिरचीचे उत्पादन घेतले जाते. येथील मिरच्या भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचवल्या जातात. दिल्ली, राजस्थान, बेळगाव, पुणे, मुंबई, पंजाब व कोलकाता अशा मोठय़ा बाजारपेठा या मिरच्यांसाठी अनुकूल आहेत. कोटय़वधींची उलाढाल असलेले मिरचीचे हे व्यवहार टाळेबंदीत काही अंशी झाले असले तरी मोठय़ा प्रमाणात व्यवहार ठप्प झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसला आहे.

टाळेबंदीच्या नियमाचा मिरची विक्रीला फटका बसत आहे. मिरची उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही मोठी समस्या आहे. मिरचीचे नुकसान झाले असल्यास आमच्या स्तरावर यासाठी अभ्यास गट स्थापन करून संबंधित माहिती गोळा करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहोत.

– के. बी. तरकसे, जिल्हा कृषी अधीक्षक