“सरकारी धोरणांमुळे पहिले भारतीय बनावटीचे विमान बनवणारे कॅप्टन अमोल यादव यांनी महाराष्ट्रामध्ये कारखाना न उभारता नाइलाजास्तव अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला,” अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रचारसभेमध्ये केली आहे. भारतामध्ये थांबण्यासाठी तरुण मुले तयार नाहीत, त्यांना परदेशात जायचे आहे. सरकारने देशामधील शहरे आणि एकंरित व्यवस्थाच बकाल करुन ठेवल्याने तरुणांची ही मानसिकता झाली आहे अशी टीका राज यांनी केली. यासाठी त्यांनी थर्स्ट एअरक्राफ्ट प्रायव्हेट लिमीटेड या कंपनीचे मालक अमोल यादव यांचे उदाहरण दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘अमोल यादव नावाच्या मराठी मुलाने एक विमान बनवले. मग मुख्यमंत्र्यांनी मेक इन इंडियाच्या अंतर्गत जमीन देण्याचे आश्वासन दिले. मात्र त्याचे पुढे काही झाले नाही. या मुलाला अमेरिकेतून बोलावणे आहे. आपल्या मराठी मुलामध्ये काय क्षमता आहे हे त्यांना कळलं, त्यांनी त्याला बोलावून घेतलं. आज तो तिकडे काम करतोय,’ असं राज यांनी अमोल यांचे उदाहरण देत सांगितले. ‘सध्या तरुणाईला भारतात रहायचेच नाहीय. येथील परिस्थिती, शहरे त्यांना नकोशी झाली आहेत. या मागे नियोजनाचा अभाव आहे,’ अशी टीका राज यांनी केली. यावेळी त्यांनी ‘१८-१८ वर्षांची पोरं परदेशात जाण्याचा विचार करत आहे का तर इथे आपलं काहीच होणार नाही हे त्यांना ठाऊक आहे,’ अशी टीका केली.

अमोल यांचे काय झाले

वांद्रे- कुर्ला संकुलात २०१८ साली झालेल्या पहिल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र या गुंतवणुकदारांच्या परिषदेत १९ फेब्रुवारी रोजी यादव आणि राज्य सरकार यांच्या सुमारे ३५ हजार कोटी रुपयांचा हा करार झाला. या करारानुसार पालघर इथे १९ आसनी विमाननिर्मितीचा कारखाना उभा करण्यासाठी राज्य सरकार यादव यांना जमीन उपलब्ध करून देणार होती. हे विमान डीजीसीए अर्थात केंद्रीय नागरी उड्डाण संचालनालयाकडे नोंदणी करण्यासाठीही त्यांना अनेक अडचणी आल्या होत्या.मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केल्यानंतर भारतीय बनावटीच्या या पहिल्या विमानाची नोंदणी झाली. या यशानंतर यादव यांनी आता १९ आसनी विमान बनवण्याचे उद्दीष्ठ समोर ठेवले होते. मात्र तसं काहीच घडलं नाही आणि अमोल यांनी अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला.

केंद्रीय नागरी उड्डाण संचालनालयाने परवानाच दिला नाही

अमोल यांनी तयार केलेले विमान उडवण्यासाठी केंद्रीय नागरी उड्डाण संचालनालयाने परवानाच दिला नाही. प्रयोगिक तत्वावर बनवण्यात आलेल्या विमानांचा उड्डाण करण्याचा परवाना देण्याचा कायदा नसल्याचे डीजीसीएने सांगितल्याने यादव यांचे स्वप्न भंग पावल्याचे वृत्त या वर्षी ९ एप्रिल रोजी ‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे. डीजीसीएने आडमुठी भूमिका घेतल्याने आपल्याला काहीच करणे शक्य नाही असं यादव यांनी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले होते. ‘माझ्यासारख्या तरुणांना मेक इन इंडियाचा खरं तर काहीच फायदा नाहीय हे सरकारी खात्याच्या अडमुठ्या भूमिकेमुळे स्पष्ट होतं आहे. मला परवानगी मिळली असती तर हजारो लोकांना या कारखान्याच्या माध्यमातून नोकरी मिळाली असती. केंद्राच्या उडाण योजनेअंतर्ग केवळ बड्या कंपन्यांना प्रोत्साहन दिले जात आहे,’ अशी खंत अमोल यांनी व्यक्त केली होती. आम्ही अमोलच्या प्रयोगासाठी सर्व काही गहाण ठेवलं होतं. त्यामुळे आम्ही आणखीन वाट पाहू शकत नाही. त्याला अमेरिकेतून विचारणा झाल्यास त्याने तिकडे जावे असं मत एप्रिल महिन्यामध्ये अमोलचे वरिष्ठ बंधू रश्मीकांत यांनी व्यक्त केले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Captain amol yadav pilot who built own airplane in 2011 plans went to us scsg
First published on: 16-10-2019 at 16:05 IST