गेवराई तालुक्यातील तांदळा येथील अपघात

बीड : भरधाव मोटार चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेवरील वीज वितरण कंपनीच्या रोहित्र (डीपी)च्या खांबावर जाऊन गाडी धडकली. गाडी वेगाने धडकल्याने खांब मोडल्याने वरील रोहित्र मोटारीवर कोसळले. यात रोहित्राखाली दबून तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाने रुग्णालयात उपचार सुरू असताना अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी मध्यरात्री हा अपघात कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावर गेवराई तालुक्यातील तांदळा येथे झाला. धडक बसताच मोठा आवाज झाल्याने बाजूच्या गावातील लोक धावले व त्यांनी जखमींना मदत केली. विवाह समारंभाहून गावाकडे परतत असताना चौघांवरही काळाने झडप घातली.

बीड जिल्ह्यतील तांदळा येथील कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावर मंगळवारी रात्री बाराच्या सुमारास गवते वस्तीजवळ भरधाव मोटार (एमएच २४-व्ही ९९२९) ही मोटार गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या रोहित्रच्या खांबावर जाऊन धडकली. गाडीचा वेग जास्त असल्याने धडक बसताच खांब पडले आणि वरील रोहित्र गाडीवर पडले. या घटनेत तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला. मोठा आवाज झाल्याने बाजूच्या गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्वाना बाहेर काढले.

या घटनेत रिजवान पटेल (सुगाव, ता.अंबाजोगाई), गोविंद नागरगोजे (लातूर), गणेश मोहन शिरसाट (फावडेवाडी, जि.लातूर) आणि विजय श्रीरंग नागरगोजे (नागदरा, ता.परळी, जि.बीड) या चौघांचा मृत्यू झाला. मृत हे सर्व २२ ते २५ वयोगटातील असून सर्व जण लातूर शहरात राहतात. एका लग्न समारंभासाठी हे चौघेही मंगळवारी एका गाडीतून गेले होते. परतत असताना अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला.