-रवींद्र जुनारकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रपूर : नेहमीच्या व्यापातून वेळ काढून भटकंती करण्याची प्रत्येकाच्याच मनात अधूनमधून घरं करत असते. भटकंती वेड असणाऱ्यासाठी कमी पैशात व्याघ्र सफारी घडवून आणणारा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. मध्य चांदा वन विभागांतर्गत बल्लारपूर वन परिक्षेत्रातील कारवा संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून कारवाच्या जंगलात गणतंत्र दिन २६ जानेवारी पासून व्याघ्र सफारीला सुरूवात होत आहे. प्रादेशिक वनक्षेत्रात अवघ्या ५०० रूपयात व्याघ्र सफारीचा हा देशातील पहिला उपक्रम आहे.

स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी लोकसहभागातून सदर पर्यटन राबविण्यात येत आहे. या सफारीसाठी ३० कि.मी चा कच्चा रस्ता आहे. या व्याघ्र सफारीत पर्यटकांना ७ वाघ, बिबट, रानगवे, अस्वल, रानमांजर, हरीण, चितळ, सांबंर निलगाय, चौसिंगा, सायाळ, रानकुत्रे, मुंगुस यासह २०० प्रकारचे पक्षी पर्यटकांना अनुभवता येणार आहे. मध्य चांदा वनविभागातंर्गत येत असलेल्या बल्लारशाह वनपरिक्षेत्रातील कारवा संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या माध्यमातून लोकसहभागातून वन- वन्यजीव व्यवस्थापन करणे, मानव व वन्यजीव यांच्यात सहजीवन प्रस्तापित होवून वनाचे शाश्वत जतन करून लोकांचे वनावरील अवलंबत्व कमी करून वनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने संयुक्त वन व्यवस्थापन समितीने ठराव घेवून पर्यटनाचा निर्णय घेतला आहे.

या ठरावात वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून जुने बैलगाडी रस्ते, कुप रस्ते यांचा वापर करून ३० कि.मी चा पर्यटनासाठी कच्चा रस्ता उपलब्ध आहे. कारवा पर्यटन प्रवेशव्दारावर रोपवाटिका आहे. प्रायोगिक तत्वावर ५०० रूपये शुल्क आकारून खाजगी वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच ३५० रूपये गाईडचे द्यावे लागणार आहे. भविष्यात नोंदणीकृत वाहनांनाही प्रवेश देण्यात येणार आहे. दररोज सकाळी ६ ते १० वाजता ४ वाहनं सोडण्यात येणार असून, दुपारी २ ते ४ वाजता ४ वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे. स्थानिक गाईडला प्रशिक्षण देण्याचा सुरू आहे, अशी माहिती मध्य चांदा वन विभागाचे उपवनसंरक्षक अरविंद मुंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी दिली.

“कारवा जंगला सोबतच फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात भद्रावती तालुक्यातील चोरा गावापासून सुरू होणाऱ्या जंगलात अशीच सफारी सुरू होणार आहे. त्यानंतर राजुरा तालुक्यात धुमाकुळ घालणाऱ्या टी १ वाघाच्या क्षेत्रात तसेच सिंदेवाही तालुक्यातही व्याघ्र सफारी सुरू होणार आहे. प्रादेशिक विभागात एकूण चार मार्ग सफारीसाठी सुरू होईल,” अशी माहिती प्रधान मुख्य वनसंरक्षक एन.आर.प्रवीण यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली.

एकूण २४ व्याघ्र सफारी मार्ग

या जिल्ह्यात व्याघ्र सफारीसाठी एकूण २४ मार्ग आहेत. त्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे कोर झोनमध्ये ६, बफर झोनमध्ये १४ व प्रादेशिक वन विभागात ४ रस्ते राहणार आहेत. एका जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात व्याघ्र सफारीसाठी रस्ते असलेला चंद्रपूर हा एकमेव जिल्हा आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Caravan forest near tadoba in chandrapur new project for tourist bmh
First published on: 24-01-2021 at 15:53 IST