गोंदियात मादी बिबट्याची गोळ्या घालून निर्घृणपणे शिकार करण्यात आली आहे. गोठनगाव वनपरिक्षेत्रात बिबट्याचा मृतदेह सापडला आहे. केळवद शिवारात ही घटना घडली आहे. दोन गोळ्या झाडून बिबट्याची शिकार करण्यात आली. शवविच्छेदन अहवालात बिबट्याला दोन गोळ्या घालण्यात आल्याचं निष्पन्न झालं. काही दिवसांपूर्वी अवनी वाघिणीची शिकार केल्याने प्राणीप्रेमींनी संताप व्यक्त केला होता. त्यातच आता बिबट्याची अत्यंत शिकार करत निर्दयीपणे पंजे कापून नेण्यात आलं आहे.

काही दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील रामदेगी वनात एका झाडाखाली ध्यान करत बसलेला एक ३५ वर्षीय भिक्खू बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाला होता. मृत भिक्कूचे नाव राहुल वाळके असल्याची माहिती मिळाली होती.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत भिक्खू राहुल वाळके हे गेल्या एक महिन्यापासून येथे ध्यान करत होते. ताडोबा अंधारी व्याघ्र संरक्षित क्षेत्राचे (बफर) उपनिर्देशक गजेंद्र नरवणे म्हणाले की, ही घटना मंगळवारी सकाळी ९.३० ते १० च्या दरम्यान घडली. त्यावेळी जंगलातील एका झाडाखाली भिक्खू ध्यानास बसले होते. जंगलात एक ऐतिहासिक बौद्ध मंदिर असून तेथून काही अंतरावर हे झाड आहे.

जंगलात हिंस्त्र प्राणी असल्याची माहिती बौद्ध भिक्खूंना दिली होती, असे त्यांनी सांगितले. घटनास्थळापासून वाळके यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. विशेष म्हणजे याच भागातील एक वाघ ५१० किमी दूर मध्य प्रदेशातील एका जंगलात गेला होता. या वाघाने दोन शेतकऱ्यांचा जीव घेतला होता.

सुमारे ४ महिन्यांच्या प्रयत्नानंतर गेल्या सोमवारी एका २ वर्षांच्या वाघाला पकडण्यात आले होते. हा वाघ १५ ऑगस्टला चंद्रपूर येथील सुपर थर्मल पॉवर परिसरातून गेला होता. मध्य प्रदेशमधील सातपुडा पॉवर परिसरात त्याला पकडण्यात आले. ४ महिन्यात या वाघाने ५१० किमीचे अंतर पार केले होते.