News Flash

सोलापुरात वाहतूक पोलिसांच्या हाती ‘स्वॅप मशिन’ येणार

निश्चलनीकरणामुळे दंडवसुलीसाठी पर्याय

सावधान!

निश्चलनीकरणामुळे दंडवसुलीसाठी पर्याय

निश्चलनीकरणामुळे रोख स्वरूपात व्यवहार बऱ्याच प्रमाणात थंडावले असताना सोलापुरात वाहतूक नियंत्रण शाखेलाही त्याचा फटका बसला आहे. वाहतूक नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करताना दंडाची रक्कम वसूल करता येणे कठीण झाले आहे. त्याचा विचार करून पोलीस प्रशासनाने आता वाहतूक पोलिसांकडे दंडात्मक वसुलीसाठी थेट ‘स्वॅप मशिन’ देण्याचा प्रस्ताव पुढे आणला आहे.

दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या सोलापूर शहरात वाहतुकीचा प्रश्न मोठा आहे. मुळात वाहतूक शिस्तीचा अभाव आहे. किंबहुना वाहतूक शिस्त मोडणे हा जणू येथील संस्कृतीचा भाग बनला आहे. जड वाहतुकीतून होणारे अपघात, मोबाइलवरून संभाषण करीत वाहने चालविणे, वाहने सार्वजनिक रस्त्यावर कोठेही उभी करणे, एकेरी वाहतुकीचे नियम मोडणे, समोरच्या किंवा बाजूच्या वाहनचालकाच्या छातीत धडकी भरेल, अशा पद्धतीने ‘धूम’स्टाईलने सुसाट वेगाने वाहने चालविणे, वाहतूक सिग्नल तोडणे, वाहनाच्या क्रमांक पाटीवर वाहन क्रमांक नसणे, किंवा बाबा, अण्णा, भाऊ, दादा, बापू, साहेब अशा शब्दांची ओळख होईल, अशा पद्धतीच्या क्रमांक पाटी असणे आदी प्रकार सर्रास घडतात. या पाश्र्वभूमीवर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी अलीकडे वाहतूक शिस्तीकडे जातीने लक्ष दिले आहे. गुन्हे शाखेच्या सहायक पोलीस आयुक्त शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्याकडे वाहतूक शाखेची प्रभारी सूत्रे देण्यात आली आहेत.

सध्या वाहतूक शाखेत सुधारणा दिसत असतानाच निश्चलनीकरणामुळे वाहतूक शाखेच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. विशेषत: वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करताना अडचणी येत आहेत. दंडात्मक कारवाईत दंडाची रक्कम वसूल करताना समोरच्या दोषी वाहनचालकाकडे दंड भरण्यासाठी रोख रकमेचा तुटवडा असल्याने दंड कसा वसूल करायचा, याची पंचाईत होते. अनेक वेळा दोषी वाहनचालकांना केवळ समज देऊन सोडण्याची पाळी येते. तर काही वेळा जेवढी तुटपुंजी रक्कम मिळेल, तेवढाच दंड आकारला जातो. परिणामी, वाहतूक शाखेकडे दंडात्मक वसुलीपोटी जमा होणारा महसूल घटत चालला आहे.

या पाश्र्वभूमीवर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांकडून कायदेशीर दंड वसूल करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे पॉस मशिन उपलब्ध करण्याचे ठरविले आहे. त्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून वाहतूक शाखेच्या सहायक पोलीस आयुक्त शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांनी दोन बँकांकडून पॉस स्वॅप मशिन उपलब्ध होण्यासाठी माहितीही मागविली आहे. त्यानुसार वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांकडून दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी येत्या काही दिवसांतच वाहतूक पोलिसांच्या हाती पॉस स्वॅप मशिन दिसणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 1:27 am

Web Title: card swipe machine traffic police
Next Stories
1 पांढऱ्या सोन्याला अजूनही झळाळी येईना पाच हजारावरच रेंगाळला बाजारभाव
2 सांगलीत पान दुकानात ‘स्वाइप मशिन’
3 शेतकरी आत्महत्यांप्रश्नी केंद्र, राज्याला नोटीस
Just Now!
X