देशभरातील तुटवडय़ामुळे दर पाच हजारांवर

राहुल खळदकर, पुणे</strong>

मिष्टान्नापासून ते सुग्रास मांसाहारी व्यंजनांमध्ये चवीच्या वैशिष्टय़पूर्ण अर्कासाठी अत्यावश्यक असलेला वेलदोडा म्हणजेच वेलचीच्या उत्पादनात यंदा प्रचंड घट निर्माण झाल्यामुळे संपूर्ण देशभरात वेलदोडय़ांना उच्चांकी भाव मिळाला आहे.  पुण्या-मुंबईसारख्या शहरात साधारणपणे ४२०० ते ५००० हजार रुपये किलो या भावाने वेलदोडय़ाची विक्री केली जात आहे.

केरळमध्ये गेल्या वर्षी आलेल्या पुरामुळे वेलदोडय़ाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला. संपूर्ण देशाची गरज भागविणाऱ्या केरळमध्ये यंदाच्या हंगामात उत्पादन कमी झाले असून नवीन हंगाम सुरू झाल्यानंतरही आवक थांबली आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून वेलदोडय़ांचा साठा संपत चालला आहे, असे मार्केट यार्डातील सुकामेव्याचे व्यापारी पूरणचंद अँड सन्सचे आशीष गुप्ता यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.  वेलदोडय़ाचा भाव आकारमानावर ठरत असून पुण्यात सध्या ४२०० ते ४५०० रुपये या भावाने विक्री केली जात आहे. मुंबईत तर वेलदोडय़ांचा भाव पाच हजार रुपये किलोच्या पुढे गेला आहे, असे गुप्ता यांनी सांगितले.

झाले काय?

संपूर्ण देशात केरळमधील वेलदोडे विक्रीसाठी पाठविले जातात. गेल्या वर्षी जुलै महिन्यात केरळमध्ये मोठा पाऊस झाला. त्याचा सर्वाधिक फटका केरळमधील कृषी क्षेत्राला बसला. त्यामुळे यंदा वेलदोडय़ांचे उत्पादन अतिशय कमी झाले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून केरळमधील वेलदोडय़ांची आवक जवळपास थांबली आहे.

आता ‘ग्वाटेमाला’वर भिस्त!

जुलै-ऑगस्ट महिन्यात केरळमधील नवीन वेलदोडा बाजारात विक्रीसाठी पाठविला जातो. यंदा तो विक्रीसच आला नाही. केरळनंतर मध्य अमेरिकेतील ग्वाटेमाला या देशात वेलदोडय़ांचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. सध्या बाजारात वेलदोडय़ांचा तुटवडा जाणवत असल्याने ग्वाटेमालातून तो आयात करावा लागणार असल्याची परिस्थिती आहे. मात्र, केंद्र सरकारने अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.