गुंतवलेले पैसे अल्प काळातच दुप्पट करण्याचे आमिष दाखवून सटाणा नाका भागातील नागरिकांना तब्बल दोन कोटीहून अधिकच्या रकमेस गंडा घालणाऱ्या सिंधुबाई मुरलीधर खोंडे या ६२ वर्षीय महिलेस येथील छावणी पोलिसांनी मुंबईच्या कळंबोली भागातून अटक केली आहे. न्यायालयाने तिची सहा दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली.
पुण्यातील एका उद्योगात गुंतवलेले पैसे दोन ते चार आठवडय़ांत दुप्पट होतात, अशी थाप तिने मारली. त्यासाठी प्रारंभी ज्यांनी पैसे गुंतवले त्यांना अपेक्षेप्रमाणे दुप्पट रक्कम तिने परत केली. शिवाय, घरकाम करणाऱ्या एका महिलेचाही तिने या कामी पद्धतशीरपणे वापर करून घेतला. या महिलेला दहा हजार रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले व नंतर तिला दुप्पट रक्कम दिली गेली. मग घरकाम करणारी महिला घरोघरी सिंधुबाईची ‘कीर्ती’ सांगू लागली. पैसे दुप्पट होत असल्याने व अपेक्षेप्रमाणे परतही मिळत असल्याने अन्य लोकांचा तिच्याविषयीचा विश्वास वाढत गेला. दुप्पट झालेले हे पैसे संबंधित लोक पुन्हा गुंतवू लागले. शिवाय पैसे दुप्पट होण्याचा हा ‘फंडा’ जसजसा लोकांच्या कानी जाऊ लागला तसतसा सिंधुबाईकडे गुंतवणूकदारांचा ओघ वाढू लागला. दहा हजारांपासून पंचवीस लाखांपर्यंतची रक्कम लोकांनी त्यात गुंतवल्याचे सांगितले जाते.
लोकांकडून पैसे जमा केल्यानंतर महिन्याभरापूर्वी ती अचानक गायब झाली होती. त्यामुळे गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले. अरुणा मनोहर गायधनी यांनी या संदर्भात फिर्याद दिली होती. दुप्पट रकमेच्या बहाण्याने आपली आठ लाखांची फसवणूक झाल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर आणखी आठ जणांनी अशाच प्रकारे फसवणूक झाल्याचे पोलिसांना सांगितल्याने फसवणुकीचा आकडा ६२ लाखांपर्यंत पोहोचला आहे. तरीदेखील फसवणूक झालेल्यांची संख्या ५० हून अधिक तसेच फसवणुकीचा आकडा सुमारे दोन कोटी असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दुप्पट रकमेच्या हव्यासाला बळी पडलेल्यांमध्ये महिलांचे प्रमाण अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. या महिलेचा महिन्याभरापासून शोध सुरू असताना दोन दिवसांपूर्वी कळंबोली भागात तिचे वास्तव्य असल्याचा सुगावा लागला. त्यानुसार छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत कांबळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तिच्या राहत्या घरी छापा टाकून तिला ताब्यात घेतले. येथील न्यायालयाने तिची सहा दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली.
बोरसेनगर भागात आठ महिन्यांपूर्वी भाडय़ाचे घर घेऊन सिंधुबाईने वास्तव्य सुरू केले होते. पुण्याच्या कोथरूड भागातील मूळ रहिवासी असल्याचे ती सर्वाना सांगत असे. सुरुवातीला या महिलेने लोकांचा, विशेषत: महिलावर्गाचा, विश्वास संपादन करण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरल्या आणि मग दुप्पट रकमा देण्याच्या आमिषाने तिच्याकडे पैसे गुंतवणाऱ्यांचा ओघ सुरू झाला.