पाण्यावरील घंटागाडीच्या माध्यमातून कमी खर्चात गोदावरीची स्वच्छता शक्य असूनही सत्ताधाऱ्यांनी पाणवेली व गाळ काढण्यासाठी तब्बल साडे सतरा कोटी रुपयांची रोबोट यंत्रणा खरेदी करण्याचा घाट घातला असून हा निर्णयच संशयास्पद असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नगरसेवक व स्थायी समिती सदस्य विक्रांत मते यांनी केला. पाण्यावरील घंटागाडीच्या साहाय्याने गोदावरीची आजवर झालेली स्वच्छता दाखवून कमी खर्चात हे काम शक्य असल्याचा दावाही त्यांनी केला.
गोदावरी नदी स्वच्छतेसाठी पाणवेली व गाळ काढण्यासाठी सत्ताधारी मनसे व भाजपने रोबोटसारखी महागडी यंत्रणा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यास विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीने आक्षेप घेतला आहे. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत अवघ्या काही मिनिटांत कोटय़वधीचे निर्णय घेतले गेले. गोदावरी नदीचे पावित्र्य कायम राखण्यासाठी नदी स्वच्छतेसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. असे असताना सत्ताधाऱ्यांनी घाईघाईने तब्बल साडे सतरा कोटीची ही यंत्रणा खरेदी करण्याचा निर्णय घेण्यामागील कारण काय, असा सवाल मते यांनी उपस्थित केला. वास्तविक, गोदावरी स्वच्छतेकामी महिनाभरापूर्वी निर्माल्य व कचरा उचलण्याकामी पाण्यावरील घंटागाडी सुरू करण्यात आली. त्याचे चांगले परिणाम सध्या गोदापात्रात पाहावयास मिळत आहे. या घंटागाडीच्या खर्चाचा विचार केल्यास दरमहा दीड ते दोन लाख रुपये खर्च येतो. वर्षभराचा हिशेब केल्यास तो खर्च २० ते २५ लाख रुपये आहे. रोबोट यंत्रणेच्या किमतीचा विचार केल्यास त्यावरील महिनाभराचे व्याज १८ लाखांच्या जवळपास होईल. या खर्चात पाण्यावरील घंटागाडीद्वारे वर्षभर गोदावरी स्वच्छ ठेवता येईल, असा दावा मते यांनी केला. यापूर्वी पाटबंधारे विभागाने नदी स्वच्छतेसाठी यंत्रणा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली होती. तथापि, त्या प्रस्तावाचा पाठपुरावा न करता हा नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची तक्रारही त्यांनी केली.