पावसाअभावी दुबार पेरणी करूनही सर्वत्र दुष्काळाचे सावट आहे, अशा स्थितीत जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी शिवसेनेने सोमवारी (दि. ११) बलगाडी मोर्चाचे आयोजन केले आहे. खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली येथील शनिवार बाजार येथून हा मोर्चा निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात येईल.
जाधव यांनी पत्रकार बठकीत याची माहिती दिली. जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, डॉ. संजय कच्छवे, डॉ. राहुल पाटील आदी उपस्थित होते. जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळी स्थिती असून गुरांच्या चाऱ्यासह पाण्याचाही प्रश्न गंभीर आहे. जलसाठे कोरडे पडले आहेत. पिकांचीही अवस्था गंभीर आहे. शेतकरी-शेतमजुरांच्या अस्तित्वाचाच प्रश्न आहे. सरकारने परभणी जिल्हा त्वरित दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शेतकऱ्यांना कर्जमाफी करून नव्याने कर्जपुरवठा करावा, शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करावे, विद्यापीठातील प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घ्यावे, धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करावे आदी मागण्या आहेत. जिल्ह्यातील शेतकरी-शेतमजूर मोठय़ा संख्येने मोर्चात सहभागी होतील, असे या वेळी सांगण्यात आले.
जिल्हाधिकारी एस. पी. सिंह यांची कामगिरी चांगली असली, तरी महसूल यंत्रणा सध्या भ्रष्ट पद्धतीने काम करीत आहे. जिल्हाधिकारी प्रामाणिक असले, तरी या प्रामाणिकतेच्या आडून अन्य अधिकारी हात धुवून घेत आहेत, असा आरोप जाधव यांनी केला. जिल्ह्यातील वाळूसाठय़ांबाबत हाच प्रकार सुरू असून जिल्ह्यात वाळूचे भाव वाढले आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळेंनी दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नावर मोर्चा काढून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला. लोकसभेतील पराभवानंतर पुन्हा विधानसभा निवडणूक समोर ठेवून भांबळे यांचे काम चालले आहे. सरकार त्यांचे असताना व महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे असताना भांबळे यांना मोर्चा काढावा लागणे ही बाब दुर्दैवी असल्याचा आरोप जाधव यांनी केला.