भारताचा ७१ प्रजासत्ताक दिन देशाभरात साजरा होत आहे. सगळीकडे प्रजासत्ताक दिनाचा उत्साहही दिसून येत आहे. पण, या सगळ्या धामधुमीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेखाटलेलं एक कार्टून सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल झालं आहे. राज ठाकरे यांनी गेल्यावर्षी प्रजासत्ताक दिनाला हे कार्टून काढलं होतं.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिवेशन नुकतेच मुंबईत पार पडले. या अधिवेशनात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बागलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना बाहेर काढण्याचा मुद्दा उपस्थित करत अप्रत्यरित्या मोदी सरकारच्या निर्णयाचं समर्थन केलं होतं. आता राज ठाकरे यांचं नाव त्यांनी गेल्या वर्षी काढलेल्या व्यंगचित्रामुळे चर्चेत आलं आहे. २६ जानेवारी २०१९ रोजी राज ठाकरे यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर टीका करणार एक व्यंगचित्र रेखाटलं होतं.

व्यंगचित्रातून उपरोधिक टोला –

राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन भाजपाध्यक्ष अमित शाह आणि भारतामातेच्या रूपात स्त्री रेखाटली होती. मोदी व शाह यांनी संपूर्ण देशालाच फासावर लटकावले आहे आणि असं स्वातंत्र्य बघवत नाही, अशी टीका केली होती. त्याचबरोबर मोदींचे हात बळकट करा, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला होता.

आता चर्चा का?

२०१४मध्ये झालेल्या निवडणुकीआधी राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींच्या कामाचे कौतूक केले होते. त्यानंतर काही कालावधीनंतर त्यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर टीका करण्यास सुरूवात केली. विशेष २०१९मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून मोदी सरकारच्या धोरणांचा समाचार घेतला होता. मात्र, राज ठाकरे यांनी मोदी सरकारविषयी मवाळ भूमिका घेतल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जाऊ लागलं आहे. त्यात त्यांनीच काढलेलं कार्टून सोशल मीडियात व्हायरल झालं असून, यंदा कोणतं कार्टून रेखाटणार, असा प्रश्नही उपस्थित केला जाऊ लागला आहे.