वृद्ध शेतक-याचे खोटे मृत्युपत्र तयार करून त्याआधारे आठ एकर शेतजमीन लाटल्याप्रकरणी एका दाम्पत्यासह पाच जणांविरुद्ध पंढरपूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पंढरपूरच्या दुय्यम निबंधक कार्यालयात हा प्रकार घडला.
सर्जेराव ज्ञानदेव पाटील, सिंधूबाई सर्जेराव पाटील, प्रताप सर्जेराव पाटील, वसंत भगवान भोसले व कृष्णा यशवंत पवार अशी या गुन्हय़ातील आरोपींची नावे आहेत. यापैकी अद्यापि कोणालाही अटक झाली नाही. हे सर्व जण पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील राहणारे आहेत. पंढरपूर दुय्यम निबंधक वर्ग-१ कार्यालयातून कुंदनकुमार चव्हाण दिलेल्या फिर्यादीनुसार सर्जेराव पाटील लक्ष्मी टाकळी येथील रामचंद्र सावंत या वयोवृद्ध शेतक-याचे बनावट मृत्युपत्र तयार करून दुय्यम निबंधक कार्यालयात सादर केले व नोंदणी करून घेतली. रामचंद्र सावंत यांच्या मालकीची आठ एकर शेतजमीन बळकावण्याच्या हेतूने या बनावट मृत्युपत्राचा वापर करून सर्जेराव पाटील व इतरांनी रामचंद्र सावंत यांची पत्नी शांताबाई सावंत व मुलगी रेखा सावंत यांची फसवणूक तथा विश्वासघात केला. एवढेच नव्हेतर त्यांच्या शेतजमिनीवर पत्रा शेड उभारून अतिक्रमण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.