पालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीचे सभापती एजाज बेग यांना झालेल्या मारहाणप्रकरणी उपमहापौर व त्यांच्या दोन्ही पुत्रांविरुद्ध किल्ला पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक होऊ शकली नाही.

महापौर हाजी मोहंमद इब्राहिम व उपमहापौर युनूस ईसा गटाच्या सदस्यांमधील शाब्दिक चकमकीचे पर्यावसान स्थायी समिती सभापतींना मारहाण होण्यात झाल्याच्या घटनेनंतर सभागृहात गोंधळ उडाल्याने महासभा तीन दिवसांसाठी तहकूब करावी लागली. तसेच या घटनेमुळे पालिका परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी शुक्रवारी रात्री किल्ला पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महासभेचे कामकाज सुरू असताना उपमहापौरांचा पुत्र माजिद याने सभागृहात अनधिकृतरीत्या प्रवेश करून स्थायी सभापती एजाज बेग यांना शिवीगाळ व मारहाण केल्याची तक्रार महापौर हाजी मोहंमद इब्राहिम यांनी दिली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी माजिदविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दुसरी तक्रार बेग यांची पत्नी नगरसेविका यास्मिन बेग यांनी दिली आहे. महापौरांशी केलेल्या संभाषणाचा राग येऊन नगरसेवक अब्दुल मालिक, उपमहापौर युनूस ईसा व त्यांचा पुत्र माजिद यांनी आपले पती एजाज बेग यांना शिवीगाळ व मारहाण सुरू केली. हे भांडण सोडवत असतांना आपल्यालाही शिवीगाळ करून सभागृहाबाहेर फरपटत नेण्यात आले, असे बेग यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार वरील तिघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांपैकी एक अब्दुल मालिक हे माजी महापौर व एमआयएमचे विद्यमान शहराध्यक्ष आहेत. महापौरांनी दिलेल्या तक्रारीचा तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक ए. एस. सुगावकर हे करीत आहेत, तर बेग यांच्या तक्रारीनुसार दाखल झालेल्या गुन्ह्य़ाचा तपास उपनिरीक्षक एस. टी. कर्नवर हे करीत आहेत.