दोन बाधित पंगतीत फिरले

हिंगोली : विलगीकरण कक्षात दाखल असतानाही नवस फेडण्यासाठी कंदुरीचे जेवण दिल्यानंतर दोघांना करोनाबाधा झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर उत्तम पुणेकर या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईहून आलेल्या दोघांनीही घरकोंडीचे  नियम मोडले. नवस फेडण्यासाठी या कर्मचाऱ्याने कंदुरीचे जेवण दिले. जेवणाच्या पंगतीमध्ये दोन करोनाबाधित फिरल्याने संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. सेनगाव तालुक्यातील लिंगपिंपरी येथे ही घटना घडली.

लिंगपिंपरी येथे मुंबईहून आलेल्या दोघांना करोनाची बाधा झाली होती. मुंबई येथे पोलीस विभागात कर्मचारी  एकच कुटुंबातील दोन करोना बाधित रुग्ण सापडले होते. या रुग्णांचे कुटुंबप्रमुख मुंबई येथे पोलीस विभागात कर्मचारी आहेत. त्याने विलगीकरण कक्षात राहत असल्याचे गावात दक्षता समितीच्या सदस्यांना सांगितले. परंतु या कुटुंबातील सदस्यांनी नियम पाळले नाही.  या कालावधीत नवस फेडण्यास गावात जेवणाचाचा कार्यक्रम ठेवला. यासाठी ७४ जंणाना निमंत्रण देण्यात आले. दरम्यान दोन सदस्यांचा अहवाल आल्यावर त्यांना  करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आणि त्याची गावभर चर्चा सुरू झाली.

संपर्कातील सर्वाना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.  सेनगावचे तहसीलदार जीवन कुमार कांबळे यांनी त्या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.