युरेनियमचा बेकायदा साठा मिळवून तो चढ्या दराने विकण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या दोन तरुणांना काही दिवसांपूर्वी दहशतवाद विरोधी पथकाकडून अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा पुढचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देण्यात आला आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने(NIA) या प्रकरणातल्या आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. जिगर पांड्या आणि अबू ताहीर अशी या आरोपींची नावे आहेत. या दोघांनी सात किलो १०० ग्रॅम युरेनियमचा साठा मानखुर्दमधल्या एका कारखान्यात लपवून ठेवला होता. हे दोघेही गेल्या वर्षभरापासून हा साठा विकण्यासाठी गुप्तपणे ग्राहक शोधत होते. त्याचबरोबर त्यांनी या साठ्याची किंमत २५ कोटींपर्यंत असल्याचं काही विश्वासू व्यक्तींना सांगितलं होतं. ही बाब दहशतवाद विरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरिक्षक संतोष भालेकर यांच्या खबऱ्याच्या लक्षात आली आणि त्याने ही माहिती दिली.


या प्रकरणातले दोन्ही आरोपी हे उच्चशिक्षित आहेत. ते एमबीए पदवीधारक आहेत. जिगर हा एका खासगी आयटी कंपनीत काम करतो तर ताहीर हा आयात-निर्यात व्यावसायिक आहे. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेलं युरेनियम ९० टक्के नैसर्गिक आणि शुद्ध असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत २१ कोटींहूनही अधिक असेल असा अंदाज आहे. या आरोपींना १२ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश आहेत. ह्या प्रकरणासंदर्भातली अधिक चौकशी आता राष्ट्रीय तपास यंत्रणा करणार आहे. त्यांनी अणुउर्जा कायद्यातल्या कलमानुसार या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आणखी वाचा- मुंबईत सात किलो युरेनियम जप्त

किरणोत्सारी गुणधर्म आणि आरोग्यास घातक असल्याने शासनाने युरेनियमला प्रतिबंधित पदार्थ म्हणून जाहीर के ले. झारखंड, आंध्र प्रदेश येथे युरेनियमच्या खाणी होत्या. त्यापैकी झारखंड येथील युरेनियम उत्खनन शासन नियंत्रणात सुरू आहे. युरेनियमचा वापर अणुऊर्जा प्रकल्प, अणू संशोधनासह क्ष-किरण शास्त्राशी (रेडिओलॉजी) संबंधित उपकरणांमध्ये होतो.

जप्त केलेले युरेनियम आरोपी ताहीर याच्या वडिलांच्या कारखानावजा गोदामात काही वर्षांपूर्वी भंगार सामानातून आले होते. घन स्वरूपातील युरेनियमच्या सळ्या जपून ठेवण्यात आल्या. टाळेबंदीत ताहीरची कारखान्यात ये-जा वाढली. त्याच्या हाती या सळ्या लागल्या. त्याने अधिक माहिती घेतल्यावर ते युरेनियम असून त्याची किंमत कोट्यावधींच्या घरात आहे, याची जाणीव त्याला झाली. त्यानंतर त्याने मित्र जिगर याला ही बाब सांगून युरेनियम विकण्याचा प्रयत्न केला, असे तपशील एटीएसच्या हाती लागले आहेत. त्याची खातरजमा सुरू आहे. मात्र जर हे खडे काही वर्षांपूर्वी भंगार सामानातून प्राप्त झाले असतील तर या प्रकरणाच्या मुळाशी जाणे आव्हान ठरू शकेल, अशी प्रतिक्रिया वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली.