करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनची घोषणा करण्यात आलेली असताना सुमारे १५०० किमीचे अंतर सायकलवरून प्रवास करून जाणाऱ्या १९ जणांना बुधवारी इचलकरंजी पोलिसांनी ताब्यात घेतले. जिल्हा व राज्य बंदी लागू असताना सायकलने उत्तर प्रदेशकडे प्रवास करणाऱ्या या यंत्रमाग कामगारांवर राष्ट्रीय व्यवस्थापन कायदा २००५ आणि महाराष्ट्र कोविड उपाय योजना २०२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

इचलकरंजी व शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील यंत्रमागावर काम करणारे १९ परप्रांतीय कामगार आपल्या उत्तर प्रदेश राज्यातील मूळ गावी सायकलने जात होते. ते कोल्हापुरातील महासत्ता चौकात दिसल्यानंतर नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी त्यांना सद्यस्थिती समजावून ताब्यात घेऊन आयजीएम रुग्णालय येथे पुढील कार्यवाहीसाठी आणले. यांनतर टाळेबंदी काळात सर्व प्रकारची प्रवासी व माल वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली असताना कोणतीही पूर्व परवानगी न घेता सायकलने प्रवास केल्याने पोलिसांनी इचलकरंजी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडील १७ सायकली जप्त केल्या आहेत.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कामगारांमध्ये  प्रदीपकुमार शामनारायण बीन, महातनकुमार रामनिहेरदीन हवलकेपास, बादलकुमार श्रीसुखारी बिन,किमलेशकुमार श्रीशामल बीन, मनिषकुमार श्रीस्वर्गी रामदयान, बिपीनकुमार इंद्रदेव सिंध,गोविंदकुमार शामनारायण बिन,अभिमन्यु रामनिहार बिंग, राहबलु जगदिश बिंद, रोहितकुमार शैलेश बिंद, नंदलाल श्रीशामलाल बिंद, राणाप्रताप रामभजन बिंद, दिलीपकुमार श्रीगोरखनाथ बिंद,पपू जगदिश बिंद,इंद्रजितकुमार श्रीरामसकल सिंद,विनोदकुमार उमाराम बिंद, राहुलकुमार सुभाषप्रताप बिंद,पिंटू निमान बिंद, चंदनकुमार रामअसिस बिंद यांचा समावेश आहे.