नग्नपूजा केली तर तुझ्यावर पैशाचा पाऊस पडेल असे आमिष दाखवून युवतीला गैरमार्गाला लावण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी येथील एका महिलेवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दापोलीत राहणाऱ्या एका महिलेने शेजारील गावात राहणाऱ्या एका परिचित युवतीशी मोबाइलद्वारे संपर्क वाढवला. घनिष्ठ ओळख झाल्यावर या महिलेने संबंधित युवतीला पैशाचे आमिष दाखवत जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. नग्नपूजा केलीस तर तुझ्यावर पैशाचा पाऊस पडेल, असे आमिष या महिलेने संबंधित युवतीला दाखवले. घाबरलेल्या युवतीने हा प्रकार आपल्या मावशीला सांगितला. या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी गेले असता संबंधित महिलेने युवती व तिच्या मावशीबरोबर वाद घातला. नंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले, मात्र कारवाई झाली नाही. दरम्यान, हा प्रकार अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते अनिश पटवर्धन यांच्या कानावर गेला. त्यांनी या प्रकरणी लक्ष घालून पोलिसांना संबंधित महिलेविरोधात जादूटोणाविरोधी कायद्याखाली गुन्हा नोंदवण्यास भाग पाडले. अखेरीस रविवारी रात्री उशिरा संबंधित महिलेविरोधात प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवण्यात आला.