बांगलादेशी घुसखोर बारबालेला भारतीय नागरिकत्वाचे बनावट पुरावे सादर करून वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सात जणांवर खालापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये पनवेलमधील दोन प्रथितयश वकील आणि दोन बारमालक यांचाही समावेश आहे. खालापूरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करून घेण्यात आला.
 अरुण शेट्टी, प्रशांत पुजारी, वसंत जैना, व्यंकटेश शेठ, आलमगीर शेख, अ‍ॅड. प्रफुल्ल विठोबा म्हात्रे आणि अ‍ॅड. संतोष विष्णू सरगर अशी या आरोपींची नावे आहेत. बनावट कागदपत्रे तयार करणे, न्यायालयाची फसवणूक करणे, कटकारस्थान करणे, देशहितविरोधी कृत्य करणे यांसारखे आरोप या सर्वावर ठेवण्यात आले आहेत.  
रोमा आलमगीर शेख या बांगलादेशी बारबालेला सात महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. तिला वाचवण्यासाठी हा सर्व घाट घातला जात होता. मूळची बांगलादेशची असणारी रोमा ही काही वर्षांपूर्वी रफीक शेख या दलालामार्फत मुंबईत आली होती. पनवेलमधील बारमध्ये ही बारबाला म्हणून काम करीत होती. मात्र रायगड पोलिसांनी सुरू केलेल्या बांगलादेशी घुसखोरविरोधी कारवाईत तिला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ती अटकेत आहे. रोमाला झालेली अटक ही पनवेलमधील काही बारमालक आणि दलाल रफीक शेख यांच्या चांगलीच जिव्हारी लागली होती. त्यामुळे त्यांनी तिला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र हे प्रयत्न आपल्या अंगाशी येऊ शकतील याचे भान त्यांना नव्हते.
   पनवेलमधील दोन प्रतिष्ठित वकिलांना सोबत घेऊन या सर्वानी रोमा भारतीय नागरिक असल्याचे बनावट दस्तऐवज गोळा केले. पश्चिम बंगालमधील एका शाळेचा बनावट दाखला, रेशन कार्ड आणि भारत सरकारचा शिक्का असलेला जन्मदाखला बनवण्यात आला. जमा केलेले बनावट दाखले वकिलांच्या मदतीने न्यायालयात सादर करण्यात आले. न्यायालयाने हे दाखले तपासण्याचे आदेश दिल्यानंतर रायगड पोलिसांनी पश्चिम बंगालमध्ये जाऊन या प्रकरणाचा तपास केला. तेव्हा सर्व दाखले बनावट असल्याचे निष्पन्न झाले, अशी माहिती रायगड बांगलादेशी घुसखोर विभागाचे प्रमुख अशोक मेश्राम यांनी दिली.   
  त्यामुळे बांगलादेशी बारबालेला वाचवण्याचे प्रयत्न आता या सात जणांच्या चांगलेच अंगाशी येण्याची शक्यता आहे. बारबालेला वाचवण्यासाठी न्यायालयासमोर बनावट कागदपत्रे सादर केल्याचे सिद्ध झाल्याने, खालापूरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी, या प्रकरणाशी संबंधित सातही आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. या घटनेमुळे पनवेल परिसरातील लेडीज बार व्यवसायाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. बांगलादेशी महिलांचा व्यापार करणारे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.