शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचारांची येताजाता थोरवी गाणाऱ्या महाराष्ट्राला लाजीरवाणे वाटणारे प्रकार आजही सुरू असून
जोशी (भटके) समाज जात पंचायतीने घेतलेल्या निर्णयांच्या तोंडी फतव्यांनी हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या फतव्यांमुळे अनेक कुटुंबियाचे जीवन अक्षरश: उध्वस्त झाले आहे.
जोशी (भटके) समाज जात पंचायतीच्या निर्णयांचा बडगा सहन करणाऱ्या कुटुंबियांना आपले आप्त-नातेवाईक यांचे लग्न असो वा कोणाचे निधन असो, त्या ठिकाणी उपस्थित राहता येत नाही. जात पंचायतीचा कोणत्याही निर्णयात इतका हस्तक्षेप असतो, की समाजातील एखाद्या कुटुंबातील लग्न कुठे होईल, लग्नात कोण उपस्थित राहील, हे देखील ही पंचायत ठरवते. समाजातील कोणी आंतरजातीय विवाह केल्यास संपूर्ण कुटुंबियास बहिष्कृत करण्याच्या निर्णयाचे चटकेही अनेक कुटुंबिय सहन करत आहेत. पंचायतीच्या धक्कादायक तोंडी निर्णयाचे स्वरूप फतव्यांप्रमाणेच. अध्यक्ष भास्कर शिंदे यांच्या पंचवटीतील नागचौक भागातील घरात प्रत्येक महिन्याच्या २५ तारखेला पंचायतीची बैठक होते. या बैठकीत कोणाला जातीबाहेर टाकायचे, कोणाला दंड घेऊन पुन्हा जातीत घ्यायचे हे ठरविले जाते. मुला-मुलींनी केलेल्या आंतरजातीय विवाहाची शिक्षा कठोरपणे पालकांना देण्याची या पंचायतीची रित आहे. या कारणावरून एखाद्या कुटुंबाला जातीबाहेर काढले की, त्याच्याशी समाजातील कोणीही कुठलाही संबंध ठेवायचा नाही. तसेच समाजातील कोणत्याही कार्यक्रमात त्या कुटंबास सहभागी होण्यास बंदी घातली जाते. समाजातील एखाद्याच्या कार्यक्रमात बहिष्कृत कुटुंबातील कोणी दिसले तर, त्याचा ठपका कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्यावर ठेवला जातो. म्हणजे, त्या कुटुंबियासही वाळीत टाकण्याची धमकी जात पंचायत देते.
जात पंचायतीच्या कारभाराचे अंतरंग अन्यायग्रस्त कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारींवरून लक्षात येते. एका महिलेला मुलीचे लग्न मुंबईला करायचे होते. परंतु, जात पंचायतीने ते नाशिकला करण्याचा फतवा काढला. तो फतवा न जुमानता महिलेने मुलीचे लग्न मुंबईला केले. या कारणावरून तिला जातीतून बहिष्कृत करण्यात आले.
निफाड तालुक्यातील विंचूर येथील सचिन बाळू धुमाळ याचे कुटुंबिय गेल्या २५ वर्षांपासून जात पंचायतीचा जाच सहन करत आहेत. तीन महिन्यांपूर्वी शहादा येथे त्याचे लग्न ठरले असताना या मंडळींनी दूरध्वनीद्वारे वाटेल ते सांगून हे लग्न मोडले. त्यांना कोणत्याही कार्यक्रमात उपस्थित राहू दिले जात नाही. त्यांच्या वडिलांना विवाह सोहळ्यात उपस्थित राहिल्याबद्दल दोनवेळा मारहाण करण्यात आली. त्यांच्या मावशीला दंड भरूनही समाजात परत घेण्यात आले नाही. या त्रासामुळे सचिन यांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. आपणास न्याय मिळावा, अशी अपेक्षा सचिन व राहुल या भावांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली. आंतरजातीय विवाह केल्यामुळे एका कुटुंबातील इतर मुलींना कुमारिका ठेवण्यापर्यंत जात पंचायतीने मजल गाठली. या कुटुंबियाशी इतर कोणीही संबंध ठेवणार नाहीत, यावर पंचायतीने लक्ष ठेवले.
तालिबानी पद्धतीने निर्णय घेणारी ही जात पंचायत मनाला वाटेल तेव्हा, काही कुटुंबियांना दंड आकारून पुन्हा समाजातही घेते. त्याकरिता संबंधित कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती पाहून दंडाची आकारणी केली जाते, असेही तक्रारीतून उघड झाले आहे. दंड आकारून कुटुंबियांची सुटका होतेच असे नाही तर पुढे संबंधित कुटुंबिय कोणत्याही कार्यक्रमात सहभागी झाले तर ‘दंड भरणारे कुटुंब’ अशी त्यांची हेटाळणी केली जाते.