News Flash

महाराष्ट्राचा रौनक मुजुमदार ‘कॅट’मध्ये देशात पहिला

राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राची आघाडी

राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राची आघाडी

देशभरातील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटमधील (आयआयएम) व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सामायिक प्रवेश परीक्षेत (कॅट २०१८) महाराष्ट्राच्या उमेदवारांनी राष्ट्रीय पातळीवर आघाडी घेतली. १०० पर्सेटाइल मिळवलेले सर्वाधिक म्हणजे सात उमेदवार महाराष्ट्राचे असून, आयआयटी कानपूरमधून अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्या  रौनक मुजुमदारने देशात पहिला क्रमांक पटकावला.

आयआयएम कलकत्तातर्फे कॅटचा निकाल शनिवारी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. देशभरातील २ लाख ९ हजार ४०५ उमेदवारांनी १४७ शहरांतील केंद्रांवर परीक्षा दिली. त्यात १ लाख ३६ हजार मुले आणि ७३ हजार ३२६ मुलींचा समावेश होता. या वर्षी चार तृतीयपंथी उमेदवारही उत्तीर्ण झाले. आधीच्या वर्षांच्या तुलनेत परीक्षा देणाऱ्यांचे प्रमाण या वर्षी सर्वाधिक होते, असे आयआयएम कलकत्ताने नमूद केले.

वेगवेगळी शैक्षणिक पाश्र्वभूमी असलेल्या उमेदवारांना नोंदणी करता यावी यासाठी कॅटच्या पद्धतीमध्ये बदल करणार असल्याचे इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटकडून सांगण्यात येत असले, तरी या परीक्षेत अग्रस्थान अभियांत्रिकी शाखेच्याच उमेदवारांनी मिळवल्याचे स्पष्ट झाले. १०० पर्सेटाइल मिळवलेले सर्व ११ उमेदवार अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान शाखेचेच आहेत. तर, ९९.९९ पर्सेटाइलसह दुसरा क्रमांक मिळवलेल्या २१ उमेदवारांपैकी १९ उमेदवार अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान शाखेचेच आहेत. स्वाभाविकपणे आयआयएममध्ये प्रवेश मिळवण्यात अभियंतेच आघाडीवर असल्याचे दिसून आले. आयआयटी दिल्लीच्या अनुभव गर्गने ९९.९९ पर्सेटाइलसह द्वितीय क्रमांक मिळवला.

माझा सर्वाधिक भर सराव परीक्षेवर होता. वर्षभरात मी जवळपास चाळीस सराव परीक्षा दिल्या. सराव परीक्षा दिल्यानंतर त्याचे विश्लेषणही मी करायचो. परीक्षा देण्यापेक्षा त्याचे विश्लेषण जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे माझ्यातील उणिवा मला नेमकेपणाने कळल्या आणि परीक्षेसाठी मी नियोजन करू शकलो. कॅट ही स्मरणावर आधारित परीक्षा नाही, तर कल, हुशारी आणि माहितीच्या उपयोगावर आधारित आहे. या परीक्षेसाठी वेळेचे नियोजनही महत्त्वाचे आहे.    – रौनक मुजुमदार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2019 12:15 am

Web Title: cat 2018 results rounak majumdar
Next Stories
1 धक्कादायक! पुण्यात मेट्रोची भलीमोठी ड्रील मशीन भररस्त्यात कोसळली
2 पुणे – बांधकाम व्यावसायिकाच्या मुलावर पाठलाग करून गोळीबार
3 ‘स्वच्छ पुणे मॉडेल’चा आता राज्यभर कित्ता
Just Now!
X