News Flash

चिंताजनक! मोतीबिंदू शस्त्रक्रियेअभावी हजारो रुग्णांची अंधत्वाकडे वाटचाल!

करोना काळात मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया रखडल्यामुळे हजारो रुग्णांची दृष्टी कायमची जाण्याची भिती निर्माण झाली आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र

संदीप आचार्य

राज्याची संपूर्ण आरोग्य यंत्रणा करोनावरील उपचारात गुंतल्यामुळे शस्त्रक्रियेअभावी मोतीबिंदू पिकलेल्या हजारो रुग्णांची अंधत्वाकडे वाटचाल सुरु आहे. यात ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या मोठी असून मोतीबिंदूमुळे दृष्टी कमकुवत झालेले हे रुग्ण घरी-दारी पडून अस्थिभंगाच्या घटनाही घडत आहेत. वेळेत मोतीबिंदू शस्त्रक्रिया न झाल्याने जवळपास पन्नास हजार लोकांची अंधत्वाकडे वाटचाल सुरु असून सरकार म्युकरमायकोसिस रुग्णांच्या प्रश्नाकडे ज्या गांभीर्याने पाहात आहे त्याच गंभीरतेने मोतीबिंदू शस्त्रक्रिया वेगाने पुन्हा कशा सुरु होतील ते पाहाणे गरजेचे असल्याचे आरोग्य व्यवस्थेतील नेत्रतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मोतीबिंदू परिपक्व झाल्यामुळे धोंडीबांना शस्त्रक्रिया करायची होती. घरच्यांनी आरोग्य विभागाच्या जिल्हा रुग्णालयात नेले परंतु बहुतेक नेत्र अधिकाऱ्यांना करोनाच्या कामाची जबाबदारी दिल्याने शस्त्रक्रिया होऊ शकणार नाही, असे तेथील डॉक्टरांनी सांगितले. धोंडीबांच्या चौकस मुलाने थोडी अधिक चौकशी केली तेव्हा २० खाटांचा नेत्रविभागाचे करोना विभागात रुपांतर केल्याचे कळले आणि हताश होऊन बाप-लेक घरी परतले. खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घेणे त्यांना परवडणारे नसल्याने जेव्हा केव्हा सरकारी रुग्णालयात डोळ्याच्या शस्त्रक्रिया सुरु होतील तेव्हा ती करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही.

दृष्टीदोषामुळे वृद्धांचे अपघात

महाराष्ट्रात असे हजारो वृद्ध पुरुष व महिला रुग्ण आहेत ज्यांचे मोतीबिंदू पिकल्यामुळे तातडीने शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे. मात्र आरोग्य विभागाच्या रुग्णालयातील नेत्र शस्त्रक्रियांचे काम जवळपास बंद असल्याने या लोकांकडे दुसरा पर्याय नाही. यातील अनेकांचे दोन्ही डोळ्याचे मोतीबिंदू परिपक्व झाले असून या मंडळींची अंधत्वाकडे वाटचाल सुरु आहे. यात सामाजिक मुद्दा म्हणजे ही वृद्ध मंडळी घरात वा बाहेर योग्य प्रकारे दिसत नसल्यामुळे पडून अपघात होणे तसेच हाड मोडून जायबंदी होणे हा असल्याचे ठाणे येथील रामकृष्ण नेत्रालयाचे प्रमुख नेत्रशल्यचिकित्सक डॉ. नितीन देशपांडे यांनी सांगितले. करोना व लॉकडाऊनमुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील लोकांचा रोजगार बुडाला आहे. परिणामी मोतीबिंदू पिकल्यामुळे दृष्टीदोष निर्माण झालेल्या वृद्ध आई- वडिलांना घरात ठेऊन घरातील कर्त्यांना कामाच्या शोधासाठी वणवण फिरावे लागले. अशात घरातील वृद्ध दृष्टीदोषामुळे पडून अपघात होणे तसेच हाड मोडण्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणात होत असल्याचे आरोग्य विभागाच्या डॉक्टरांनी सांगितले.

महाराष्ट्रात आरोग्य विभागाची रुग्णालये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था तसेच खाजगी रुग्णालयात मिळून वर्षाकाठी सुमारे साडेसात लाख मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. गेल्या वर्षभरात हे प्रमाण करोनामुळे कमालीचे घसरले असून शासकीय आकडेवारीनुसार केवळ एक लाख ७८ हजार शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. याचाच अर्थ जवळपास पाच लाखाहून अधिक रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया होऊ शकलेल्या नाहीत. यातील बहुतेक मंडळी ही वृद्ध असून अनेकांच्या दोन्ही डोळ्यातील मोतीबिंदू पिकलेला आहे. मोतीबिंदू पूर्ण परिपक्व झालेल्या या रुग्णांची किमान वर्षभरात शस्त्रक्रिया न झाल्यास त्याची अंधत्वाकडे वाटचाल होऊ शकते. त्यातही रुग्णाला मधुमेह झाला असल्यास रुग्णाला काचबिंदू होऊन कायमचे अंधत्व येऊ शकते, असे आरोग्य विभागाच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. राज्यात अंधत्वाकडे वाटचाल करणारे जवळपास ५० हजार रुग्ण असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. या रुग्णांच्या तातडीने शस्त्रक्रिया होणे गरजेचे असल्याचे या डॉक्टरांचे म्हणणे आहे.

वर्षभरात फक्त १ लाख ७८ हजार शस्त्रक्रिया

राज्यात वर्षाकाठी होणाऱ्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेत आरोग्य विभागाच्या रुग्णालयात सुमारे ९० हजार शस्त्रक्रिया होतात, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५० हजारच्या आसपास मोतीबिंदू शस्त्रक्रिया होतात. धर्मादाय रुग्णालयात सुमारे २ लाख शस्त्रक्रिया होतात तर खासगी रुग्णालयात जवळपास अडीच लाखाच्या आसपास शस्त्रक्रिया केल्या जातात. लॉकडाऊनच्या गेल्या वर्षभरात बहुतेक खाजगी रुग्णालये बंद होती तर ‘राज्य करोना कृती दलाने’च अत्यावश्यक शस्त्रक्रिया वगळता अन्य शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या अशी भूमिका घेतल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व आरोग्य विभागाच्या रुग्णालयातील मोतीबिंदू शस्त्रक्रिया जवळपास बंद आहेत. परिणामी गेल्या वर्षी राज्यात केवळ एक लाख ७८ हजार रुग्णांच्याच मोतीबिंदू शस्त्रक्रिया होऊ शकल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

दोन कोटी लसी जमिनीतून उगवल्या का?; फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल

आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या रुग्णालयातील नेत्रविभागाची अवस्था तशीही वाईटच आहे. नेत्र विभागातील ‘वर्ग १’ नेत्रतज्ज्ञांची बहुतेक पदे भरण्यात आलेली नाहीत. वर्ग १ नेत्रतज्ज्ञांच्या एकूण ४२ मंजूर पदांपैकी ३० पदे रिक्त आहेत तर नेत्र अधिकाऱ्यांच्या ६९१ पदांपैकी ११२ पदे भरलेली नाहीत. याशिवाय विभागाला लागणारी अन्य सहाय्यक, परिचारिका आदी पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. याही परिस्थितीत आरोग्य विभागाअंतर्गत जिल्हा रुग्णालये व अन्य रुग्णालयातून करोनापूर्वी वर्षाकाठी ९० हजार मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जात होत्या. यासाठी बाह्य रुग्ण विभागात मोठ्या प्रमाणात रुग्ण तपासणी केली जायची. मात्र, करोना काळात नेत्र शस्त्रक्रिया बंद झाल्यामुळे नेत्रतज्ज्ञ तसेच नेत्र अधिकाऱ्यांना करोनाच्या कामाला जुंपण्यात आले. परिणामी २०२१ मध्ये केवळ २३,२६३ मोतीबिंदू शस्त्रक्रिया आरोग्य विभाग करू शकल्याचे एका ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले.

मोतीबिंदूची शस्त्रक्रिया ‘तातडीची’ व्याखेत नाही!

आरोग्य विभागाच्या जिल्हा रुग्णालय व अन्य काही रुग्णालयात मिळून एकूण ९० नेत्र शस्त्रक्रियागृह आहेत. त्यापैकी ३५ शस्त्रक्रिया गृहात नेत्र शस्त्रक्रिया केल्या जातात. यासाठी प्रत्येक जिल्हा रुग्णालयात डोळ्याच्या रुग्णांसाठी २० खाटा राखून ठेवण्यात आल्या आहेत. मात्र करोना काळात सर्व जिल्हा रुग्णालयातील नेत्र विभागासाठी राखीव असलेल्या खाटांचे रुपांतर करोना रुग्णांसाठी करण्यात आल्यामुळे आम्ही काहीही करु शकत नाही, अशी हतबलता आरोग्य विभागातील काही नेत्रतज्ज्ञांनी व्यक्त केली. याबाबत आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉ. पद्मजा जोगेवार यांना विचारले असता, करोनामुळे मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे रुग्ण यायला तयार होत नाहीत, तसेच बहुतेक रुग्णालयातील नेत्ररुग्णांच्या खाटा करोना रुग्णांसाठी राखून ठेवल्याचे त्यांनी सांगितले. मोतीबिंदू शस्त्रक्रिया या तातडीची शस्त्रक्रिया या व्याख्येत बसत नसल्याने तसेच करोनासाठी नेत्र अधिकारी अनेक ठिकाणी काम करत असल्याने मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा वेग मंदावल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र जेथे आवश्यक आहेत तेथे या शस्त्रक्रिया केल्या जात असल्याचे डॉ. जोगेवार यांनी सांगितले.

म्युकरमायकोसिसची परिस्थिती चिंताजनक – राजेश टोपे

मोतीबिंदू परिपक्व झाल्यानंतर वेळेत शस्त्रक्रिया झाली नाही तर अशा रुग्णांना काचबिंदू होऊन अंधत्व येऊ शकते असेही त्यांनी सांगितले. मात्र अशा रुग्णांची संख्या कमी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अशीच परिस्थिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असून याबाबत वैद्यकीय शिक्षण संचालक व नेत्र शल्यचिकित्सक डॉ तात्याराव लहाने यांना विचारले असता, ग्रामीण भागात वृद्ध व मोतीबिंदू असलेल्या लोकांचे घरात पडून होणारे अपघात तसेच हाड मोडण्याचे प्रकार घडत असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षी १५ मार्चपासून पूर्वनियोजित शस्त्रक्रिया बंद झाल्या तर आरोग्य यंत्रणा करोना रुग्णांवरील उपचारात व्यस्त झाली आहे. परिणामी मोतीबिंदू शस्त्रक्रियांचे प्रमाण कमी झाले आहे. तरीही दोन्ही डोळ्यात मोतीबिंदू असलेल्या रुग्णांची माहिती घेण्याचे काम ६८५ नेत्र अधिकारी करत असून अशा रुग्णांना शोधून त्यांच्या शस्त्रक्रिया केल्या जात असल्याचे डॉ. लहाने यांनी सांगितले. पावसाळ्यात तसेच मधुमेह असलेल्या व मोतीबिंदू पिकलेल्या रुग्णांना काचबिंदू होऊन वेळीच उपचार न झाल्यास अंधत्व येऊ शकते असेही डॉ. लहाने यांनी सांगितले. माझ्या माहितीप्रमाणे दहा हजार रुग्णांच्या मोतीबिंदूची शस्त्रक्रिया होणे आवश्यक आहे. उशीरा शस्त्रक्रिया झाल्यास शस्त्रक्रिया गुंतागुंतीची बनते तसेच रुग्ण बरा होण्यास जास्त कालावधी लागतो असे डॉ. लहाने व डॉ. नितीन देशपांडे यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१९ मध्ये मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र योजना त्यांनी जाहीर केली होती. तेव्हा १७ लाख रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले होते. या शस्त्रक्रिया त्यावेळी मोठ्या प्रमाणात होऊ शकल्या नाहीत. नंतर सरकार बदलले व करोनामुळे मोतीबिंदू शस्त्रक्रिया जवळपास ठप्प झाल्या असून आरोग्य विभागाच्या काही नेत्रतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार किमान ५० हजार रुग्णांची अंधत्वाकडे वाटचाल सुरु असून मियुकरमायकोसिस रुग्णांसाठी पाठपुरावा करणाऱ्या आरोग्यमंत्र्यांनी मोतीबिंदू रुग्णांच्या शस्त्रक्रियांसाठी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2021 10:05 pm

Web Title: cataracts operations in maharashtra pending due to corona patients may become blind pmw 88
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 Coronavirus : राज्यात दिवसभरात ४७ हजार ३७१ जण करोनामुक्त; ७३८ रूग्णांचा मृत्यू
2 Cyclone Tauktae : ‘ओएनजीसी’ने सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन न केल्यानेच कामगारांचा मृत्यू – नवाब मलिक
3 ‘हिवरेबाजारचा करोनामुक्तीचा पॅटर्न’ पंतप्रधान मोदींनी देखील घेतला जाणून!
Just Now!
X