गुजरातहून महाराष्ट्राच्या पालघर सीमावर्ती भागातून मोठय़ा प्रमाणात शेळ्या, मेंढय़ा, बोकड व गाई, म्हशी अशा गुरांची वाहतूक राजरोसपणे सुरू आहे. त्यामुळे या जनावरांवर नव्याने आलेल्या ‘काँगो’ तापाचे संक्रमण  (क्रायमिन काँगो हेमोरेजिक फिव्हर) जिल्ह्य़ात  या तापाच्या संसर्गाची भीती व्यक्त केली जात आहे. केंद्र शासनाने जिल्हा प्रशासनाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. तरीही  तंदुरुस्ती प्रमाणपत्राशिवाय जिल्ह्य़ातील पशू वाहतूक सुरू असल्याचे उजेडात आले आहे.

गुजरातमध्ये सध्या पशूंवर गोचिडामुळे काँगो ताप बळावत असल्याचे वृत्त आहे. या तापाचे विषाणूबाधित गुरांच्या संपर्कात आल्यास मानवाला लागण होण्याचा धोका असल्याचा इशारा तज्ज्ञांनी आजवर केलेल्या अभ्यासाच्या आधारे दिला आहे.

गुजरात राज्यात पशुधनाची विक्री आणि  व्यवसाय मोठय़ा प्रमाणात आहे. तेथून अनेक राज्यांत बोकड, शेळ्या, मेंढय़ा आणि गुरे महाराष्ट्रात आणली जातात. जनावरांची वाहतूक पालघर जिल्ह्यच्या सीमावर्ती भागातून  इतरत्र केली जाते. गुजरातेतून आणल्या जाणाऱ्या गुरांची तलासरी येथील नाक्यावर तपासणी होत नसल्याची बाब उघड झाली. गुरांची बेकायदा आणि दाटीवाटीने वाहतूक होत असल्याच्या प्रकाराकडे तपासणी नाका प्रशासनासह पशुसंवर्धन विभागाचा कानाडोळा होत असल्याच्या तक्रारी आहेत.

दिल्लीहून पथक

काँगो ताप प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी एक पथक दिल्लीहून पालघर येथे दाखल झाले आहे. या पथकात  कीटक शास्त्रज्ञासह, राष्ट्रीय विषाणू संस्था, शास्त्रज्ञ केंद्रीय रोग प्रसार संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञ, याशिवाय गुजरातमधील काही तज्ज्ञांचा या समावेश आहे. या पथकाद्वारे जिल्ह्य़ात विविध ठिकाणी सर्वेक्षण केले जाणार आहे. यानंतर तापाचा संसर्ग रोखण्यासाठीच्या उपाययोजना, त्यावरील उपचार यासंबंधीची माहिती पशुसंवर्धन विभागासह आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाला देणार आहेत.

जिल्ह्य़ातील पशुधन

३,५०, ०००

गायी-म्हशी

१,५०,०००

शेळ्या-मेंढय़ा