निसर्गाच्या लहरीपणामुळे खरिपाची पिके हातातून गेली. तरीही शेतकऱ्यांनी सावरत बँकेतून कर्ज, उसनवारी आणि सावकोराकडून कर्ज घेऊन रब्बी पिके घेतली, परंतु फेब्रुवारीपासून मेहकर तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक भागातील अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी पिकांचे नुकसान झाले. शनिवारी जानेफळ येथे बैलबाजारात बुलढाणा, वाशीम व अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठय़ा प्रमाणात आपले पशुधन विक्रीसाठी आणले होते. 

गायी व बल म्हणजे शेतकऱ्यांचा जीव की प्राण, परंतु पावसाने अवकृपा केल्याने पाणीटंचाई आणि चाराटंचाईचा सामना करीत ही मुकी जनावरे पोसायची कशी, हाही प्रश्न सतावू लागला आहे. दरम्यान, घरातील विवाहकार्य, मुलांची शिक्षणे, शेतीची मशागत, पुढे बी-बियाणे खते घेण्यासाठी होणारी ससेहोलपट, या सर्व प्रश्नांची उत्तरे शेतकऱ्यांकडे नाहीत. परिणामी, अतिशय जड अंत:करणाने शेतकरी आपले पशुधन बाजारात विक्रीसाठी आणत आहे. यावेळी त्यांचा जीव मेटाकुटीला येत आहे. ‘धरले तर चावते अन् सोडले तर पळते’ अशा अवस्थेला सध्या शेतकरी तोंड देत आहेत. यावर्षी खरिपाच्या हंगामात पावसाने दगा दिल्याने बळीराजा कमालीचा आर्थिक विवंचनेत सापडला आहे. परिणामी, अलीकडच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाणही वाढले आहे.
आज चाऱ्याचे भाव गगनाला भिडले असल्याने पशुधनाचा सांभाळ करणे अवघड झाले आहे. यंदा चाऱ्याचा भाव दुपटीने वाढणार आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याला ज्वारीचे ५० टक्केसुद्धा उत्पन्न हाती लागले नाही. ज्वारीच्या कडब्यांचा चारा उन्हाळ्यात पुरवला जातो. मात्र, चारा बुरशीमुळे खराब होत आहे. जनावरांच्या सुक्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालल्याने बळीराजाला पशुधन वाचविण्यासाठी व्यापाऱ्यांकडून मागेल त्या किमतीला चारा घेण्याची परिस्थिती उद्भवणार आहे. काही दिवस मक्याचा चारा, गवत, कडबा आदी प्रकारचा ओला व सुका महागडा चारा खरेदी करून बळीराजाने पशुधन जोपासले. मात्र, आता पाणी व चाऱ्याची गंभीर समस्या उभी राहणार असल्याने, तसेच आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यासाठी शेतकरी आठवडी बाजारात मोठय़ा प्रमाणात आपले पशुधन घेऊन येत आहे. योग्य भावात पशुधनाची विक्री करून शेतकरी आपला पैसा मोकळा करण्यामागे लागला आहे.