कलबुर्गी, गौरी लंकेश हत्याप्रकरणाचा तपास; जालन्यातून आणखी एक माजी नगरसेवक ताब्यात

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासह कर्नाटकातील ज्येष्ठ साहित्यिक कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश, अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणाशी संबंधित धागेदोरे तपासासाठी मुंबई-औरंगाबाद व कर्नाटकातील दहशतवादी विरोधी पथक, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग मराठवाडय़ातील औरंगाबाद, जालना या जिल्ह्य़ात सध्या तळ ठोकून आहे. सीबीआयने जालन्यातून आणखी एका माजी नगरसेवकाला ताब्यात घेतले असून, त्याच्या फार्म हाऊसची झडतीही घेतल्याची माहिती मिळते आहे.

औरंगाबाद येथील दौलताबाद तालुक्यातील केसापुरी गावात राहणाऱ्या शरद कळसकर आणि सातारा येथील शिवप्रतिष्ठानचा सुधन्वा गोंधळेकर या दोघांना एटीएसने मुंबई येथे अटक केली होती. तपासादरम्यान अटक करण्यात आलेला वैभव राऊत हा अटकेच्या दोन आठवडय़ांपूर्वी औरंगाबाद येथील कैलासनगर, बसय्येनगर भागात येऊन गेल्याचे समोर आले होते. त्यानंतर महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे राज्यभरात धाडसत्र सुरू झाले. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने स्थानिक एटीएसची मदत घेत १४ ऑगस्ट रोजी शहरातील कुंवाँर फल्ली गल्लीत राहणाऱ्या  सचिन अंदुरे याला तो काम करत असलेल्या निराला बाजार येथील कपडय़ाच्या दुकानातून तर जालना येथे राहणाऱ्या श्रीकांत पांगरकर याला ताब्यात घेतले होते. पांगरकर हा दोन वेळा शिवसेनेचा नगरसेवक राहिला असल्याची माहिती देखील समोर आली आहे. दरम्यान सचिन अंदुरे याची कसून चौकशी केली असता त्याने व साथीदाराने दाभोळकरांवर गोळी झाडल्याचे समोर आले. त्यानंतर एटीएसने केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) ताब्यात दिले.

त्यानंतर सचिन अंदुरे याचे मेव्हणे शुभम सुरळे व अजिंक्य सुरळे यांच्यासह रोहित रेगे यांनाही अटक करण्यात आली. मात्र ही अटक त्यांच्याविरुद्ध येथील सिटी चौक पोलीस ठाण्यात शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी नोंदवलेल्या गुन्ह्य़ाखाली आहे.

सध्या ते तिघे पोलीस कोठडीत आहेत. दरम्यान या घटनेनंतर औरंगाबाद-मुंबई एटीएस आणि सीबीआयने सखोल तपास करत जालना येथील आणखी एका माजी नगरसेवकाला ताब्यात घेतले असून जालन्याजवळील एका शेतातील २ मजली इमारतीवर छापा मारल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे सध्या एटीएस, सीबीआयचे पथक औरंगाबाद, जालन्यात तळ ठोकून असल्याचे दिसत असून, दारूगोळ्याशी संबंधित औरंगाबादेतील एका दुकानाचीही झडती घेतल्याची माहिती पुढे येत आहे.