राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूरातील घर आणि कार्यालयांवर सीबीआयच्या पथकांनी छापेमारी केली. अचानक झालेल्या कारवाईनंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी टीका केली आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनीही शंका उपस्थित केली. राऊतांच्या शंकेला भाजपानं प्रत्युत्तर दिलं आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांवरून राजीनामा दिला. या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर देशमुख यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज अचानक सीबीआयने देशमुख यांच्या घर आणि कार्यालयांवर छापेमारी केली. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी टीका केली होती.

राऊत यांनी केलेल्या टीकेला भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “गडबड जरूर है… जेव्हा १६ वर्षानंतर अचानक रात्रीतून वाजेला घेतलं जातं. जेव्हा वाझे काय लादेन आहे का? म्हणत समर्थन केलं जातं. वर्षभरात फक्त बदल्या आणि कंत्राटदारांची बिलं काढली जातातं,” असं म्हणत केशव उपाध्ये यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे.

संजय राऊत काय म्हणाले होते?

“कुछ तो गडबड है… मा.उच्च न्यायालयाने फक्त प्राथमिक चौकशीचे आदेश देत अहवाल सादर करा असे सीबीआयला सांगितले होते. अनिल देशमुखांवर धाडी. एफ.आय.आर..वगैरे अतिरेक आहे. हा सर्व प्रकार न्याय व तर्कसंगत दिसत नाही. दया..कुछ तो गडबड जरूर है,” अशी शंका राऊत यांनी देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या सीबीआय कारवाईवर उपस्थित केला होता.

“राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच धाडी”

“मा. उच्च न्यायालयाने केवळ ‘प्राथमिक चौकशी’चे आदेश दिलेले होते. या प्राथमिक चौकशीतून काय निष्पन्न झाले? याचा अहवाल कोर्टासमोर मांडण्यात आल्याचे अद्यापपर्यंत ऐकिवात नाही. परंतु ॲन्टिलिया व हिरेन हत्या प्रकरणात ज्यांना अटक करण्यात आली आणि ज्यांच्यावर संशयाची सुई आहे, त्यांच्या विधानावरून ही चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. या चौकशीच्या मिळालेल्या परवानगीचा उपयोग सीबीआय धाडसत्र घालून राजकीय उद्दिष्टे साध्य करताना दिसत आहे. अशा धाडींचा राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच वापर होत आहे, आम्ही याचा तीव्र निषेध करतो,” असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या कारवाईचा निषेध केला आहे.