नाशिकमधील महानगरपालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टाकीला गळती होऊन हकनाक २४ करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून याप्रकरणी जबाब नोंदवले जात आहेत. तसंच या घटनेच्या चौकशीसाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची उच्चस्तरीय समितीदेखील तातडीने स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान ऑक्सिजन गळती नेमकी कशी झाली याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“राजेश टोपे तुमच्या निबरपणाचा धिक्कार असो”

सीसीटीव्हीमध्ये कर्मचारी टाकीत ऑक्सिजन भरत असतानाच अचानक गळती सुरु झाल्याचं दिसत आहे. तसंच यानंतर कर्मचाऱ्यांची झालेली धावपळही स्पष्ट दिसत आहे.

बुधवारी दुपारी ऑक्सिजनच्या टाकीला गळती होऊन रुग्णालयात हाहाकार उडाला होता. वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्याने २४ रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यू तांडवामुळे नातेवाईक, रुग्णालय व्यवस्थापनासह प्रशासकीय यंत्रणाही हादरली. रात्री उशिरापर्यंत आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे, अन्न-औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आदींचे भेटसत्र सुरू होते. गुरूवारी रुग्णालयात शांतता असली तरी दुर्घटनेची छाया प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होती. धास्तीमुळे दाखल झालेले रुग्णांचे नातेवाईक आवारात ठाण मांडून होते. पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला. प्राणवायूच्या टाकीतील गळती तज्ज्ञ अभियंत्यांनी सव्वा ते दीड तासात बंद केली होती.

२४ करोनाबाधितांचा हकनाक बळी

१३ किलो लिटर क्षमतेची टाकी पुण्यातील टायो निपॉन सान्सो कॉर्पोरेशनकडून १० वर्षासाठी भाडेतत्वावर घेण्यात आली आहे. महिनाभरापूर्वी ही व्यवस्था कार्यान्वित झाली. प्राणवायूच्या टाकीतील गळतीस जबाबदार असणाऱ्या व्यक्तींची हलगर्जी, निष्काळजी यांमुळे हे मृत्यू झाल्याचे पोलिसांनी तक्रारीत म्हटले आहे. तपासासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना यांच्या नेतृत्वाखाली तीन पथकांची स्थापना करण्यात आली. पथकांनी मृतांचे नातेवाईक, रुग्णालय व्यवस्थापनातील अधिकारी, कर्मचारी यांचे जबाब नोंदविण्यास सुरूवात केली आहे.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cctv of nashik zakir hussain hospital oxygen tank leak sgy
First published on: 23-04-2021 at 13:30 IST