‘पुणे तिथे काय उणे’ ही म्हण तुम्ही आतापर्यंत अनेकदा ऐकली असेल. पुण्यातल्या माणसांचं आणि शहराचं कौतुक करताना अनेकदा ही म्हण वापरली जाते. याच म्हणीचा प्रत्यय सध्या आला आहे. पुण्यातील धायरी परिसरातील (सिंहगड रस्ता) अनेक नागरिकांना मंगळवारी चक्क सोन्याचे पेढे खाण्याचा आनंद मिळवला. येथील एका व्यक्तीने गाडी घेतल्याच्या आनंदात चक्क सोन्याचे पेढे वाटले आहेत.

धायरी परिसरात राहणारे बागायतदार सुरेश पोकळे यांनी जग्वार एक्स एफ ही कार विकत घेतली. ६० लाखाची आलिशान कार विकत घेतल्याचा आनंद त्यांच्या गगणात मावेनासा झाला होता. या आनंदाच्या भरात सुरेश पोकळे यांनी आपल्या इष्टमित्रांना सोन्याचे पेढे खाऊ घालण्याचा निर्णय घेतला आणि ही सुवर्णपेढ्यांची ऑर्डर काका हलवाई मिठाईवाल्यांकडे नोंदवली.

काका हलवाई यांनीही पोकळे यांच्यासाठी विशेष सोन्याचे वर्ख असलेले पेढे बनवून दिले. ७ हजार रुपये किलो दरानं काका हलवाईनं पोकळे कुटुंबियांना हे खास पेढे बनवून दिले. पोकळे यांनी एकुण किती पेढे वाटले याची माहिती मात्र जाहीर करण्यात आली नाही.

सुरेश पोकळे यांना महागडी गाडी खरेदी केल्यानंतर त्याचा आनंदही शाही पद्धतीनं साजरा करायचा होता. त्यामुळेच त्यांनी लोकांना सोन्याचा वर्ख असलेले पेढे वाटून त्यांचं तोंड गोड केले.