मावळते खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा पराभव झाल्याचे कोणतेही आश्चर्य येथील मतदारांना वाटले नाही. सामान्य माणसातून उठून प्रस्थापितांची सोबत करणे त्यांना चांगलेच महागात पडले. ऐनवेळी शिवसेनेला दगा देत काँग्रेसवासी होणे यातच त्यांच्या पराभवाची बीजे रोवली होती. शिवसेनेत असते तर याहीवेळी पूर्वीपेक्षा मोठय़ा मताधिक्याने निवडून आले असते, मात्र पक्षबदल करून त्यांनी राजकीय आत्महत्या केल्याचे मानले जात आहे. दरम्यान, महायुतीच्या येथील कार्यकर्त्यांनी आज येथे मोठा जल्लोष केला.
यापूर्वीच्या खासदारांचा अनुभव लक्षात घेता वाकचौरे यांनी तुलनेने अधिक काम मतदारसंघात केले होते. गावोगाव सभामंडपांच्या माध्यमातून त्यांनी जनतेला आपलेसे केले होते. कोणीही नेता सोबत नसला तरी जनता मात्र वाकचौरेंच्या सोबत होती. शिवसेनेच्या तिकिटावर वाकचौरे लढले असते तर आज ते विजयी उमेदवारांत असते. मात्र अखेरच्या क्षणाला शिवसेनेला झुलवत ठेवत ऐनवेळी ते काँग्रेसवासी झाले. मतदारसंघातील प्रस्थापित नेत्यांच्या तुलनेत वाकचौरे जनतेला आपलेसे वाटत होते. मात्र तेही प्रस्तापितांच्या कळपात दाखल झाल्याने जनतेच्या मनात नाराजी निर्माण झाली. त्याचा पुरेपूर फायदा सेनेच्या कार्यकर्त्यांनी उठवला. त्याचीही सुरुवात संगमनेरमधूनच झाली. संगमनेरच्या त्या प्रकारानंतर प्रचंड झालेले वाकचौरे पाहावयास मिळाले. येथूनच ते बॅकफुटवर गेल्याचे मानण्यात येते. त्यानंतर जेथे जातील तेथे शिवसैनिकांनी त्यांचा पिच्छा पुरवल्यामुळे ते पुरते हतबल होऊन आत्मविश्वासही डळमळीत झाला.
पाच वर्षे सत्तेत राहूनही वाकचौरेंना आपला कार्यकर्तावर्ग निर्माण करता आला नाही. त्यामुळे ज्या तालुक्यात जातील त्या तालुक्यातल्या नेत्यांवरच त्यांना विसंबून राहावे लागले. विखे, थोरात या मंत्रिद्वयांनी त्यांच्यासाठी मेहनत घेतली, काँग्रेसच्या पहिल्या फळीतील कार्यकर्त्यांनीही नेत्यांसोबत काम केले. मात्र नवीन पिढी अर्थात नवीन मतदार वाकचौरेंच्या पूर्णत: विरोधात गेला. मोदी लाट नसती तरीही वाकचौरेंचा पराभव झाला असता इथपर्यंत वातावरण टिपेला पोहोचले होते. वाकचौरे बुडत्या जहाजात बसले हा सेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा इशारा खरा ठरला. मोदी लाटेत वाकचौरे विरोधी लाट सामील झाल्याने त्यांचा पराभव अटळ असल्याचे प्रचारादरम्यानच स्पष्ट होत गेले. काँग्रेसच्या प्रचारसभांना होणारी तोकडी गर्दी तालुक्यात चर्चेचा विषय ठरली होती. त्यामुळेच आजच्या त्यांच्या पराभवाचे कोणालाही आश्चर्य वाटले नाही.
ऐनवेळी सेनेचे उमेदवार झालेले सदाशिव लोखंडे यांची मात्र चांगलीच लॉटरी लागली. प्रचाराला पुरेसा वेळ मिळाला नाही. अनेक गावांच्यात जाताही आले नाही, अशी त्यांची स्थिती झाली. मात्र मतदारसंघातील वाकचौरे विरोधी व देशातील मोदी लाट त्यांच्या कामी आली. मतदारसंघात कोणताही प्रभाव नसलेल्या महायुतीच्या स्थानिक नेत्यांचे लोखंडे यांच्या विजयातील योगदान मात्र नगण्य आहे. मात्र श्रेयासाठी आता त्यांच्यात चढाओढ सुरू होण्याची चिन्हे आहेत. वाकचौरे यांना निवडून आणण्याची जबाबदारी पक्षश्रेष्ठींनी विखे व थोरात या मंत्रिद्वयांवर सोपवली होती. वातावरण पाहता हे दोन्ही मंत्रीही चिंतित होते. मात्र संपूर्ण देशभरातच काँग्रेसचा सफाया झाल्याने दोन्ही मंत्र्यांपुढील संकट तूर्तास टळले आहे.