राज्यासह देशभरात आज गुढी उभारून  नववर्षाचे स्वागत केले जात आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा वसंत ऋतूचा पहिला दिवस आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक अशा या दिनाचे औचित्य साधून राज्यांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  मुंबईतील गिरगावासह डोंबिवली, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नागपूर, सोलापूर आदी शहरांमध्ये सकाळपासूनच शोभायात्रांना सुरुवात झाली. ढोलताशांच्या गजरात पारंपरिक कपडे परिधान करुन नववर्षाचे स्वागत करण्यात आले. अनेक ठिकाणी पर्यावरणाचे सवंर्धन करण्याबरोबर सामाजिक संदेशाच्या गुढीही उभारण्यात आल्या आहेत. लोकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.

ढोल-ताशांचा नाद, ध्वजांची आरास, सामाजिक संदेश, समृद्धी व विजय यांचे प्रतीक असणाऱ्या गुढीची उभारणी, पारंपरिक पोशाखात नटलेली मंडळींनी वातावरणात एकप्रकारचा उत्साह दिसून येत आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक अशा या दिनाचे औचित्य साधून शहरांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रांगोळ्यांची कलाकुसर, दुचाकी आणि सायकलींवर स्वार झालेल्या महिला व पुरुष, विविध ढोलपथकांची गर्जना, ध्वजपथकांची आकर्षक सादरीकरणे, तलवारबाजी, दांडपट्टा यांसारख्या गोष्टींची प्रात्यक्षिके, निरनिराळ्या विषयांवरचे चित्ररथ आणि चलचित्र, सामाजिक संदेशांची देवाणघेवाण आणि पारंपरिकतेचा मोहोर असे शोभायात्रांचे स्वरूप दिसत आहे.